अहिल्यानगर-पाथर्डी आणि बीड येथे ढगफुटीसदृश पाऊस; शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान 

 

 

अहमदनगर | प्रतिनिधी

 

अहिल्यानगर जिल्ह्याचा पूर्व भाग आणि बीड जिल्ह्याचा पश्चिम भागात ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने पूर परिस्थिती गंभीर बनली आहे. नद्यांना पूर आल्याने गावांत पाणी शिरले असून ग्रामस्थ पुरात अडकले आहेत. पाथर्डी तालुक्यातील जगसून तांडा येथील एक जण पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात पाथर्डी तालुका आणि बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यात या पूरामुळे सर्वाधिक फटका बसला आहे.

 

कडा (ता. आष्टी) येथे पूर परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याने बचावासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. लष्करी जवानांनी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू केले असून जिल्ह्यातील आपत्ती निवारण पथके बचावकार्यात असून काही ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने लोकांना पुरातून बाहेर काढले जात आहे. आतापर्यंत अनेक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात यश आले असून सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. मात्र अनेक शेतकऱ्यांची जनावरे वाहून गेली आहेत आणि शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.

 

अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील करंजी, जवखेडे, तिसगाव, मढी या भागात ढगफुटीसदृश पाऊस झाला. परिसरातील गावे पाण्याने वेढली गेली असून पुलांवरून पाणी वाहत असल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. करंजी आणि जवखेडे या गावांमध्ये सुमारे 70 ते 80 नागरिक पुरात अडकले होते. स्थानिक ग्रामस्थ आणि आपत्ती निवारण पथकांनी त्यांची सुटका केली. करंजी गावात पुरात अडकलेल्या 16 ग्रामस्थांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे.

 

पाथर्डीचे तहसीलदार उद्धव नाईक, पोलीस निरीक्षक विलास पुजारी आणि अहिल्यानगर महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे बचाव पथक करंजीमध्ये दाखल झाले आहेत. करंजी गावातील प्रसिद्ध उत्तरेश्वर मंदिरालाही पुराचा वेढा बसला आहे. ग्रामस्थांनी सांगितले की, अनेक वर्षांनंतर करंजी गावात अशी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. नदी पात्र सोडून पाणी गावात शिरल्याने पक्क्या घरांत राहणारे नागरिकही अडकले आहेत.

 

अहिल्यानगर-जामखेड रस्त्यावरील सारोळाबद्धी परिसरातील पूल पुराच्या पाण्यामुळे वाहून गेला. या रस्त्याचे काम सुरू असले तरी वाहतूक वळवण्यासाठी तयार केलेला तात्पुरता पूलही वाहून गेल्याने या रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे चिचोंडी पाटील आणि परिसरातील गावांचा अहिल्यानगर शहराकडे येण्याचा संपर्क तुटला. कडा येथेही पुलावरून पाणी वाहत असल्याने नगर ते जामखेड वाहतूक ठप्प झाली होती.

 

शेजारीच असलेल्या बीड जिल्ह्यातही पूर परिस्थिती गंभीर आहे. कडी नदीला आलेल्या पुराचे पाणी गावात शिरल्याने सर्वत्र ग्रामस्थ अडकले आहेत. अनेक जण इमारतींवर चढून मदतीची याचना करीत होते. त्यामुळे बचाव कार्यासाठी थेट लष्करालाच पाचारण करण्यात आले आहे. आमदार सुरेश धस कडी गावात दाखल झाले असून लष्करी पथकाने हेलिकॉप्टरच्या सहाय्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.

 

दरम्यान, दुपारनंतर पावसाने उघडीप दिल्यामुळे थोडासा दिलासा मिळाला आहे आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *