दिव्यांग नागरिकांना शासकीय योजनांची माहिती आणि तक्रार निवारण प्रक्रिया सुलभ करण्याच्या दिशेने राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. विभागाने एआय (AI) आधारित WhatsApp Chatbot (क्रमांक: 7821922775) सुरू केला असून, या नव्या उपक्रमामुळे दिव्यांग व्यक्तींना शासनाच्या विविध योजनांची माहिती आणि तक्रार नोंदणीची सुविधा आता केवळ एका क्लिकवर उपलब्ध झाली आहे.
दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, “या सेवेमुळे दिव्यांग नागरिकांना शासनाच्या सर्व योजनांची माहिती मिळवणे, तक्रार दाखल करणे आणि तिची सद्यस्थिती पाहणे अधिक सुलभ होईल. शासनाच्या सुविधा आता त्यांच्या मोबाईलवर थेट उपलब्ध होतील.”
📱 या उपक्रमाची ठळक वैशिष्ट्ये:
भाषिणी तंत्रज्ञानावर आधारित व्हॉईस नोटद्वारे तक्रार नोंदणी
सेल्फ-ट्रॅकिंग सुविधा — तक्रारीची सद्यस्थिती थेट WhatsApp वर पाहता येईल
मराठी किंवा इंग्रजी भाषेत आवाज रेकॉर्ड करून तक्रार पाठवण्याची सुविधा
सर्व शासकीय योजना व सेवांची माहिती एका ठिकाणी उपलब्ध
हा एआय-आधारित चैटबॉट दिव्यांग नागरिकांसाठी माहिती, तक्रार नोंदणी आणि निवारण यासाठी एक प्रभावी डिजिटल पूल ठरणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या Digital Maharashtra, Inclusion For All आणि Accessible India या उद्दिष्टांच्या दिशेने ही एक अभिनव आणि महत्त्वपूर्ण पायर मानली जात आहे.