पाथर्डी | नितीन गटाणी
‘भटक्यांची पंढरी’ म्हणून देशभर प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र मढी येथे रंगपंचमीच्या मुहूर्तावर श्रद्धेचा महाकुंभ भरला. ‘कानिफनाथ महाराज की जय’, ‘अलख निरंजन’ आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषात महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील सुमारे आठ लाख भाविकांनी श्री चैतन्य कानिफनाथ महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले.
रंगपंचमीच्या दिवशी कानिफनाथ महाराजांनी संजीवन समाधी घेतली होती. या ऐतिहासिक दिवसाच्या औचित्याने दरवर्षी मढी गडावर भाविकांची मोठी गर्दी होते. यंदाही डफ, ताशा आणि शंखांच्या निनादाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. मंदिराच्या कळसाला काठी टेकवण्यासाठी हजारो भाविकांनी गडावर मोठी गर्दी केली होती. प्रशस्त रस्ते आणि वाहनांच्या सुलभ सुविधेमुळे यंदा भाविकांच्या संख्येने नवा उच्चांक गाठल्याचे दिसून आले.
नवनिर्वाचित विश्वस्त मंडळाने अत्यंत कमी कालावधीत भाविकांच्या सुविधेसाठी मोठी पावले उचलली. पाथर्डी-मढी रस्ता, निवडुंगे-मढी रस्ता तसेच कानिफनाथ बहुउद्देशीय सभागृहाजवळ सुमारे साठ एकर क्षेत्रावर करण्यात आलेली पार्किंगची व्यवस्था यशस्वी ठरली. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यास मोठी मदत झाली. पुढील वर्षी पार्किंगच्या रस्त्यांचे मजबुतीकरण करण्याचे आश्वासन विश्वस्त मंडळाने दिले असून, भाविकांनी या नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.


