अहिल्यानगर | प्रतिनिधी
सर्वधर्मीय दिव्यांग व मूकबधिर बांधवांसाठी प्रहार करिअर अकॅडमी, अहिल्यानगरच्या वतीने राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन रविवारी करण्यात आले. प्रहार करिअर अकॅडमीचे संस्थापक-अध्यक्ष व प्रसिद्ध उद्योजक संतोषजी पवार तसेच संचालक व माजी सैनिक विनोदसिंग परदेशी यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम आयोजित करण्यात आला.
या मेळाव्यास आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष व प्रसिद्ध आदर्श सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत, दिव्यांग व मूकबधिर बांधवांसाठी आयोजित करण्यात आलेला हा मेळावा समाजासाठी दिशादर्शक ठरेल, असे सांगितले. अशा उपक्रमांतून सामाजिक बांधिलकी जपली जाते आणि दिव्यांग व्यक्तींनाही सामाजिक स्थैर्य मिळण्यास मदत होते, असे गौरवोद्गार त्यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून दोन हजारांहून अधिक युवक-युवतींनी या मेळाव्यास उपस्थिती दर्शविली. वधू-वर परिचयाच्या माध्यमातून अनेकांनी आपल्या पसंतीचा जीवनसाथी निवडण्याची संधी मिळवली. विशेष म्हणजे कार्यक्रमस्थळीच १० हून अधिक जोडप्यांनी एकमेकांना जीवनसाथी म्हणून पसंती देत नव्या आयुष्याची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला.
यावेळी प्रहार करिअर अकॅडमीचे संस्थापक-अध्यक्ष संतोषजी पवार यांनी सांगितले की, “आज समाजामध्ये सुदृढ युवक-युवतींची लग्ने जुळणेही आव्हानात्मक झाले आहे. अशा परिस्थितीत दिव्यांग व मूकबधिर बांधवांसाठी आयोजित केलेला हा उपक्रम निश्चितच समाजापासून काहीसा दूर राहिलेल्या या वर्गासाठी आशेचा किरण ठरेल.”
कार्यक्रमास इग्नाइट अकॅडमीचे संचालक धनंजय कचाले, प्रहार दिव्य क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष धर्मेंद्र सातव, महासचिव रामदास खोत, उपाध्यक्ष शिवाजी गाडे, धाराशिव जिल्हाप्रमुख मयूर काकडे, अहिल्यानगर जिल्हाप्रमुख लक्ष्मीताई देशमुख, सामाजिक कार्यकर्ते प्रा. हर्षल आगळे, समीना शेख, कल्पना दाभाडे यांच्यासह प्रहार दिव्य क्रांती संघटनेचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच अॅड. विजय राऊत, अॅड. लक्ष्मण पोकळे, पप्पू येवले, विजू भंडारे आणि नानासाहेब पारधे यांनीही कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश बडे यांनी केले. सूत्रसंचालन हनुमंत महाराज यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. हर्षल आगळे यांनी केले. मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी प्रहार करिअर अकॅडमीचे पदाधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
दिव्यांग व मूकबधिर बांधवांच्या वैवाहिक जीवनाला नवी दिशा देणारा आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडणारा हा राज्यस्तरीय मेळावा सामाजिक बांधिलकीचा आदर्श उपक्रम
ठरला.



