10 वी 12 वीतील गुणवंतांचा आनंदधाम येथे सत्कार; विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शनाचे आयोजन

अहिल्यानगर | प्रतिनिधी

ज्ञान हे यशस्वी जीवनाचे मूलभूत अधिष्ठान मानले जाते. 19 व्या शतकातील दिव्य विभूती राष्ट्रसंत आचार्य सम्राट प पू श्री आनंदऋषिजी म सा यांनी आपल्या आयुष्यात त्याग आणि संयमासोबतच ज्ञानप्राप्तीला विशेष महत्त्व दिले होते. जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत त्यांनी ज्ञानयज्ञ अखंड प्रज्वलित ठेवला.

त्याच पावन प्रेरणेतून आनंदधाम येथे महाराष्ट्र प्रवर्तक पू श्री कुंदनऋषिजी म सा, प्रबुद्ध विचारक श्री आदर्शऋषिजी म सा तसेच संस्कार दिवाकर पू श्री आलोकऋषिजी म सा यांच्या सान्निध्यात श्री तिलोकरत्न जैन धार्मिक परीक्षा बोर्ड आणि महावीर सेना यांच्या संयुक्त विद्यमाने 10 वी व 12 वी परीक्षेत विशेष गुणवत्ता प्राप्त सकल जैन समाजातील अहिल्यानगर येथील विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात बहुआयामी व्यक्तिमत्त्व प्रोफेसर डॉ. अशोककुमारजी पगारिया विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. पगारिया हे पुणे येथील भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष असून, ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स, दिल्ली या संस्थेचे माजी राष्ट्रीय महामंत्री तसेच वर्तमान सकल प्रांत जैन भवन योजना अध्यक्ष आहेत. याशिवाय ते अहिल्यानगर येथील आनंद नवकार परिवार ट्रस्टचे कार्याध्यक्ष असून प्रख्यात चार्टर्ड अकाउंटंट म्हणूनही परिचित आहेत.

हा सत्कार व मार्गदर्शन समारंभ रविवार, 31 मे 2026 रोजी सकाळी 8.30 ते 10.30 या वेळेत आनंदधाम येथे होणार आहे. या कार्यक्रमास अहिल्यानगर शहरातील सकल जैन समाजातील विद्यार्थी, विद्यार्थीनी आणि पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री तिलोकरत्न जैन धार्मिक परीक्षा बोर्ड व महावीर सेना व श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ अहिल्यानगर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *