पुणे विद्यापीठाच्या अहिल्यानगर उपकेंद्रात पालक-विद्यार्थी करिअर मार्गदर्शन मेळावा उत्साहात
अहिल्यानगर | प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अहिल्यानगर उपकेंद्रात दि. २२ मे २०२६ रोजी विद्यार्थी व पालकांसाठी एकदिवसीय करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. बाबुर्डी घुमट परिसर तसेच अहिल्यानगर शहरातील विद्यार्थी व पालकांनी या कार्यशाळेला मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.
कार्यक्रमात विद्यापीठाच्या एज्युटेक फाउंडेशनचे CEO डॉ. दीपक हर्डीकर यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात १२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी बी.एस्सी. डाटा सायन्स हा अत्यंत उपयुक्त व भविष्याभिमुख अभ्यासक्रम असल्याचे सांगितले. डेटा सायन्स क्षेत्रात करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाचा गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. संदीप पालवे यांनी उपकेंद्रामार्फत विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या विविध शैक्षणिक सुविधा व उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सहायक कुलसचिव डॉ. शिवप्रसाद घालमे यांनी प्रास्ताविकातून अहिल्यानगर उपकेंद्राचा आजपर्यंतचा प्रवास विशद केला. तसेच बी.एस्सी. डाटा सायन्स अभ्यासक्रम सुरू करण्यामागील विद्यापीठाची भूमिका स्पष्ट केली.
डॉ. बी. के. थोरवे यांनी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या रोजगार व करिअर संधींबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित पालकांच्या विविध प्रश्नांना मान्यवरांनी उत्तरे देत त्यांच्या शंकांचे समाधान केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. पी. एस. मेटकर यांनी केले.



