लाडकी बहीण योजनेचे मानधन सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य : जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Ladki Bahin Yojana E-KYC:महायुती सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर सुरुवातीपासूनच विरोधकांनी सडकून टीका केली होती. तरीही या योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फायदा झाल्याचे दिसून आले. यानंतर आता या योजनेची छाननी सरकारकडून सुरू झाली असून, लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे.

२६.३४ लाख लाभार्थींचे मानधन तात्पुरते रोखले

महिला व बालविकास विभागाच्या सूत्रांनुसार, विविध कारणांमुळे २६ लाख ३४ हजार लाभार्थी बहिणींचे मानधन छाननी पूर्ण होईपर्यंत रोखण्यात आले आहे. याचा अर्थ त्या कायमस्वरूपी अपात्र ठरलेल्या नाहीत. छाननीनंतर पात्र ठरलेल्या लाभार्थींना दरमहा मिळणारे १,५०० रुपये नियमित दिले जातील. सध्या २.२९ कोटी महिलांना योजनेचा लाभ मिळत असून सरकार दरमहा साडेतीन हजार कोटी रुपये खर्च करत आहे.

ई-केवायसी दोन महिन्यांत पूर्ण करणे बंधनकारक

पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात १८ सप्टेंबरपासून दोन महिन्यांच्या आत पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. वेळेत ई-केवायसी प्रक्रिया न केल्यास पुढील मानधन रोखण्याची शक्यता आहे.

ई-केवायसी प्रक्रिया कशी कराल?

  1. प्रथम https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  2. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी ई-केवायसीसाठी असलेल्या “ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा” या पर्यायावर क्लिक करा.
  3. नवीन पेज उघडल्यानंतर आधार क्रमांक व कॅप्चा कोड प्रविष्ट करा. माहिती योग्य प्रकारे नोंदवावी.
  4. आधार प्रमाणीकरणासाठी संमती द्या व “ओटीपी पाठवा” या पर्यायावर क्लिक करा.
  5. आधार क्रमांकाशी जोडलेल्या मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून प्रक्रिया पूर्ण करा.

 

ही प्रक्रिया पारदर्शकता राखण्यासाठी तसेच पात्र लाभार्थींना नियमित लाभ मिळावा यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ई-केवायसी पूर्ण केल्याने भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासही मदत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *