पत्रकारांच्या अडचणी सोडवण्यासाठी सरकार सकारात्मक – विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

शिर्डी | विशेष प्रतिनिधी (राजेंद्र देवढे)

पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत. बदलत्या परिस्थितीत वास्तवाचे भान ठेवून पत्रकारांना येणाऱ्या अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे प्रतिपादन विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींना कायमस्वरूपी प्रशिक्षण केंद्र नागपूर येथे सुरू करण्याबाबत निश्चितपणे विचार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

शिर्डी येथे राज्य वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती समितीची दोन दिवसीय बैठक सुरू आहे. या निमित्ताने विधानपरिषद सभापती प्रा. शिंदे यांनी समिती सदस्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी समितीचे अध्यक्ष यदु जोशी आणि माहिती संचालक डॉ. गणेश मुळे यांनी त्यांचा सत्कार केला.

या प्रसंगी राज्य समिती सदस्य नवनाथ दिघे, प्रकाश कुलथे, नाशिक विभागीय समितीचे अध्यक्ष सुधीर लंके तसेच राज्य समितीचे अन्य सदस्य उपस्थित होते. दरम्यान, महिला दिनानिमित्त प्रा. शिंदे यांच्या हस्ते राज्य अधिस्वीकृती समिती सदस्या सविता हरकरे आणि नेहा पुरव यांचा सत्कार करण्यात आला.

प्रा. शिंदे म्हणाले, समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचे महत्त्वाचे काम पत्रकार करत आहेत. पत्रकारितेचे महत्त्व अबाधित ठेवण्यासाठी पत्रकारितेतील मूल्ये टिकवून ठेवणे आवश्यक आहे. भविष्यकाळातील गरजा आणि पत्रकारांच्या अडचणी ओळखून समितीने त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बदलत्या काळात प्रत्येक नागरिक सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले मत व्यक्त करत असल्याने तो एकप्रकारे पत्रकारच झाला आहे. अशा परिस्थितीत पत्रकारांनी सकारात्मक दृष्टिकोनातून काम करत वंचितांना न्याय मिळवून देण्याचे कार्य सुरू ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी माहिती संचालक डॉ. गणेश मुळे यांनी आभार मानले.

दरम्यान, समितीचे अध्यक्ष यदु जोशी यांनी समितीच्या कामकाजाची माहिती दिली. नागपूर येथील विधानभवन अधिवेशन काळ वगळता इतर वेळी बंद असते. त्यामुळे त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी देशपातळीवरील प्रशिक्षण केंद्र सुरू करावे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधिमंडळ कामकाजाचे वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांसाठीही ते केंद्र उपयोगी ठरेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *