पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती निमित्त जिल्ह्यात विविध स्पर्धांचे आयोजन

अहिल्यानगर | प्रतिनिधी

 

पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा लोककल्याणकारी आदर्श जीवनपट आणि राष्ट्रासाठी दिलेले योगदान युवकांना समजून घेता यावे आणि त्यातून युवकांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी त्यांच्या जयंती निमित्त गुरुवार, २५ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व चौदा तालुक्यात महाविद्यालयीन निबंध, वक्तृत्व आणि पोस्टर सादरीकरण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. समितीच्या वतीने युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

या निमित्ताने वर्षभर विविध उपक्रम राबविण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. समितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे महाराष्ट्र राज्य वैचारिक प्रबोधन प्रमुख रविंद्र मुळे, विनायक देशमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अहिल्यानगर उपकेंद्राचे सहाय्यक कुलसचिव डॉ. शिवप्रसाद घालमे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सुनील शिंदे यांचा तसेच चौदा तालुक्यांतील समन्वयकांचा समावेश आहे.

 

तालुकास्तरीय स्पर्धेतून तीनही स्पर्धांतील प्रथम तीन क्रमांकाचे एकूण नऊ स्पर्धक जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडले जातील. जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे समितीने आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *