अहिल्यानगर फुटबॉल सुपर लीगमुळे क्रीडाक्षेत्राला नवी ऊर्जा — जिल्हाधिकारी पंकज आशिया नमोह फुटबॉल क्लब तर्फे स्पर्धेचे भव्य आयोजन; उदयोन्मुख फुटबॉलपटूंना प्रशिक्षण व संधी

अहिल्यानगर | जैनवार्ता

अहिल्यानगरच्या क्रीडाक्षेत्रात नवचैतन्य निर्माण करणारी अहिल्यानगर फुटबॉल सुपर लीग स्पर्धा नमोह फुटबॉल क्लब तर्फे नगर क्लब मैदानावर सुरू झाली आहे. या उपक्रमामुळे नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल, असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी काढले. त्यांनी नमोह फुटबॉल क्लबच्या प्रयत्नांचे कौतुक करत क्रीडा संस्कृती बळकट करण्याचे आवाहन केले.

स्पर्धेचे आयोजन नगरच्या प्रसिद्ध क्रीडा प्रशासक नमिता फिरोदिया यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. प्रकाशजी फिरोदिया फाउंडेशन हे मुख्य प्रायोजक असून सुरुची मसाले यांनी सहप्रायोजकत्व दिले आहे. या उद्घाटन समारंभाला जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्यासह त्यांची पत्नी सौ. मोनिका आशिया, अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या प्रमुख श्रीमती छायाताई फिरोदिया, इंडियन स्पोर्ट्स डिव्हिजनचे हेड ऑफ स्कूल स्पोर्ट्स लॉरेन्स बीज तसेच प्रसिद्ध अभिनेत्री हेमल इंगळे उपस्थित होत्या.

राष्ट्रगीताने उद्घाटन समारंभास सुरुवात झाली. उपस्थित खेळाडूंनी पाहुण्यांना मानवंदना दिली आणि अहिल्यानगर फुटबॉल सुपर लीग ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले. आकाशात रंगीबेरंगी फुगे सोडून उपस्थितांचा उत्साह द्विगुणित झाला. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते टॉस करून स्पर्धेची सुरुवात झाली.

लॉरेन्स बीज म्हणाले, “ही स्पर्धा महाराष्ट्रातील प्रमुख फुटबॉल स्पर्धांना लाजवेल असे भव्य संयोजन आहे. यातून नवे फुटबॉलपटू घडतील, असा आम्हाला विश्वास आहे.”

स्पर्धेत आरडीएक्स जूनियर्स, मुनोत स्ट्रायकर्स, जीसी फायटर्स, गुलमोहर चॅलेंजर्स, विद्यादान अल्फा एक्स, गांधी वॉरियर्स, कॉन प्लेक्स सुपरहिरोज आणि लोढा स्ट्रायकर्स हे आठ संघ सहभागी झाले आहेत. या संघांनी लिलावातून खेळाडूंना विकत घेतले. या लिलावात ऋत्विक वाबळे (AWG ग्रुप), सिद्धार्थ मुनोत (NBS Flexible Solutions), दर्शन भंडारी (गुलाबचंद कार्पेटवाला), जोहेब खान (गुलमोहर स्पोर्ट्स), रोहित रामदिन व भावेश मिश्रा (विद्याधाम क्लासेस), चेतन गांधी (प्रोस्पोस्पर्स), तसेच प्रणील मुनोत, राखी लोढा व दीपिका लोढा (कॉन प्लेक्स थिएटर) यांनी सक्रिय सहभाग घेतला.

स्पर्धेपूर्वी सर्व खेळाडूंना प्रशिक्षण देण्यात आले असून, त्यानंतर त्यांना लिलाव प्रक्रियेतून संघांमध्ये समाविष्ट करण्यात आले. या स्पर्धेचा सातवा सिझन असून नमोह फुटबॉल क्लबचे सिद्धार्थ वांद्रे आणि ऋत्विक चव्हाण हेही स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रयत्नशील आहेत.

अहिल्यानगर फुटबॉल सुपर लीगमुळे क्रीडाप्रेमी युवकांमध्ये स्पर्धात्मकता वाढून स्थानिक क्रीडा क्षेत्राला नवी दिशा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *