
अहिल्यानगर | प्रतिनिधी
Ahilyanagar rain news: अहिल्यानगर जिल्ह्यात काल ता. २७ सप्टेंबर संध्याकाळपासून ते ता. २८ सप्टेंबर पहाटेपर्यंत संततधार पावसाने हाहाकार माजवला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील अनेक भागांत नदी-नाले तुडुंब भरून वाहत असून प्रशासन सतर्कतेचा इशारा देत आहे.
अहमदनगर शहरात सीना नदीला पूर आला असून कल्याण रोड बंद आहे. पुराचे पाणी नेप्ती नाका परीसरापर्यंत आले आहे.

राहाता तालुक्यातील शिर्डी-साकोरी (नगर-मनमाड महामार्ग) येथील हॉटेल फाऊंटनजवळील नाल्यात ४ जण वाहून गेले. त्यापैकी अक्षय गोरे व अमोल व्यवहारे यांना वाचवण्यात यश आले असून रोहीत खरात व प्रसाद विसपुते यांचा शोध सुरू आहे.
जामखेड तालुक्यात पिंपळगाव उंडा येथे घराची भिंत कोसळून पारूबाई किसन गव्हाणे (६८) यांचा मृत्यू झाला.
नेवासे तालुक्यातील चिलेखनवाडी येथे पिराजी भिमराव पिटेकर (८०) यांचा घराची भिंत कोसळून मृत्यू झाला.

पिंपळगाव माळवी येथे तलाव ओव्हरफ्लो होण्यास अवघे ४ इंच शिल्लक असून पुराचे पाणी अहिल्यानगर शहराकडे जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
संगमनेर तालुक्यात मौजे सादतपूर येथील पाझर तलाव ओव्हरफ्लो झाल्याने बोरसे वस्तीतील ७० कुटुंबे (सुमारे २२४ नागरिक) संपर्कविहीन झाले आहेत. प्रशासन या भागाशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
मेहकरी नदीला आलेल्या पुरामुळे पारेवाडी, पारगाव-भातोडी रस्ता बंद झाला असून ५-६ बंधारे फुटल्याने पाणी शेतात घुसले आहे.
कापुरवाडी तलाव पूर्ण भरल्याने मौजे नागरदेवळे येथील ४-५ घरात पाणी शिरले असून नागरदेवळे-भिंगार रस्ता बंद करण्यात आला आहे.
श्रीगोंदा तालुक्यात मांडवी नदीला पूर आल्याने बनंपिप्री ते काकडे वस्ती रस्ता बंद आहे.
जायकवाडी, नांदूर मधमेश्वर, भंडारदरा, निळवंडे, मुळा, सीना, कुकडी, खैरी आदी महत्त्वाच्या धरणांमधून हजारो क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
सध्या पावसाने थोडी विश्रांती घेतली असली तरी जिल्हा प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवर असून बचाव आणि मदतकार्य सुरू आहे.



