AI नवकल्पकतेला युकेची मान्यता; नगरच्या संशोधकांची AI Powered Supply Chain Device UK Design Patentमध्ये नोंद

अहिल्यानगर | जैनवार्ता

जिल्ह्याच्या व्यवस्थापन व औद्योगिक क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी एक उल्लेखनीय नोंद झाली आहे. बीपीएचईस् च्या आयएमएस (IMS) व्यवस्थापन संस्थेचे प्रा. डॉ. सय्यद मुदस्सर आणि एमआयडीसीतील न्यु-वे इंडस्ट्रियल प्रॉडक्ट्सचे संचालक व संशोधक डॉ. निलेश पठारे यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या “AI Powered Supply Chain Device” या अभिनव डिझाईनची नोंद युनायटेड किंगडम इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑफिस (UK IPO) कडून अधिकृत डिझाईन पेटंट म्हणून करण्यात आली आहे.

हे उपकरण कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित असून आधुनिक सप्लाय चेन मॅनेजमेंट व लॉजिस्टिक्स प्रणाली अधिक वेगवान, सुरक्षित आणि कार्यक्षम बनविण्यावर केंद्रित आहे. साठा व्यवस्थापन, ट्रॅकिंग, गुणवत्ता नियंत्रण, वितरण व्यवस्थापन यांसारख्या औद्योगिक प्रक्रियांमध्ये हे तंत्रज्ञान नव्या कार्यक्षमतेचा अध्याय लिहिणारे ठरणार आहे.

डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनच्या या युगात उद्योगसंस्थांची वेळ, खर्च व मनुष्यबळ बचत करणारे प्रभावी समाधान म्हणून या डिव्हाइसकडे तज्ज्ञांकडून सकारात्मक दृष्टीने पाहिले जात आहे.

डिझाईन पेटंट नोंदणीमुळे दोन्ही संशोधकांना त्यांच्या कल्पकतेला विधिसंरक्षणाचा महत्त्वाचा टप्पा गाठता आला आहे. पुढील काळात या तंत्रज्ञानाचे मॉड्युलर स्वरूपात विस्तार करून ते प्रत्यक्ष उत्पादनात आणण्याचे नियोजन दोन्ही संशोधकांनी केले आहे.

डॉ. सय्यद मुदस्सर हे मागील १५ वर्षांपासून व्यवस्थापन क्षेत्रात शैक्षणिक व संशोधन कार्यरत आहेत, तर डॉ. निलेश पठारे हे औद्योगिक क्षेत्रातील संशोधननिष्ठ उद्योजक म्हणून परिचित आहेत.

या उल्लेखनीय यशाबद्दल बीपीएचईस् आयएमएस संस्था, उद्योगजगत, तसेच जिल्ह्यातील उद्योजकीय व संशोधक वर्तुळातून दोन्ही संशोधकांचे अभिनंदन होत असून हा उपक्रम तरुण संशोधकांसाठी प्रेरणादायी आदर्श ठरत असल्याचे मान्यवरांनी नमूद केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *