आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी सुदाम बटुळे यांचा सत्कार

अहिल्यानगर | प्रतिनिधी

आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचे प्रसारण अधिकारी सुदाम बटुळे यांची पदोन्नती होऊन कार्यक्रम अधिकारीपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी केंद्रातील हंगामी निवेदकांनी त्यांचा सत्कार केला. आकाशवाणी कार्यालयात किरण डहाळे, अतुल सातपुते आणि आदिनाथ अन्नदाते यांच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन बटुळे यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रम अधिकारीपदावर कार्यरत असताना बटुळे श्रोत्यांसाठी नवनवीन आणि दर्जेदार कार्यक्रम देतील, असा विश्वास निवेदक किरण डहाळे यांनी व्यक्त केला. त्यांनी बटुळे यांच्या पदोन्नतीमुळे आकाशवाणीत कार्यक्रम निर्मितीला नवी दिशा मिळेल, असेही सांगितले.

सत्काराला उत्तर देताना सुदाम बटुळे यांनी आगामी काळात श्रोत्यांसाठी काही नवीन कार्यक्रम राबवण्याचा मानस असल्याचे सांगितले. “कार्यक्रम अधिकारी म्हणून काम करताना सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. या सहकार्याच्या बळावर आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक श्रोत्यांपर्यंत सकारात्मक आणि उपयुक्त कार्यक्रम पोहोचवू. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे आकाशवाणीचे ब्रीदवाक्य कृतीतून सिद्ध करण्याचा प्रयत्न राहील,” असेही त्यांनी नमूद केले.

या वेळी हंगामी कार्यालयीन सहाय्यक वृषाली घनवट उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *