अशोकभाऊ फिरोदिया वक्तृत्व व वादविवाद स्पर्धेत धूत स्कूलचा दबदबा; सहिला कोकणे व वरद लोखंडे प्रथम

अहिल्यानगर | जैनवार्ता

अ.ए.सो.च्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा आणि हिंदी दिनानिमित्त वाद-विवाद स्पर्धा उत्साहात पार पडली. संस्थेचे संस्थापक स्व. अशोकभाऊ फिरोदिया यांच्या स्मरणार्थ आयोजित या स्पर्धांना शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वक्तृत्व आणि वाद-विवाद या दोन्ही स्पर्धांतील संघात्मक विजेतेपदाचा फिरता चषक सेठ नंदलाल धूत इंग्लिश मीडियम स्कूलने पटकाविला.

वक्तृत्व स्पर्धेत अशोकभाऊ फिरोदिया स्कूलच्या सहिला कोकणे हिने प्रथम क्रमांक मिळवला, तर वाद-विवाद स्पर्धेत याच शाळेच्या वरद लोखंडे याने प्रथम क्रमांक पटकावला.

शाळेच्या सभागृहात पार पडलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी स्व. अशोकभाऊ फिरोदिया व स्व. शांतीकुमारजी फिरोदिया यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे व परीक्षक म्हणून स्वच्छ भारत अभियान महाराष्ट्रचे ब्रँड ॲम्बेसिडर आणि प्रेरणा महिला मंडळाच्या अध्यक्षा डॉ. अश्‍लेशा भांडारकर, अहमदनगर कॉलेजचे प्रा. डॉ. विलास नाबदे, तसेच वाद-विवाद स्पर्धेसाठी परीक्षक मच्छिंद्र देसाई व आनंद त्रिपाठी उपस्थित होते. शाळेचे प्राचार्य प्रभाकर भाबड, उपप्राचार्या कविता सुरतवाला, विभाग प्रमुख वैशाली वाघ, रेखा शर्मा आणि ज्योती सुद्रिक यांनी उपस्थिती दर्शविली.

समूहगीताने पाहुण्यांचे स्वागत शिक्षिका रेणुका पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी केले. वक्तृत्व स्पर्धेसाठी स्पर्धकांना ऐनवेळेस विषय देण्यात आले होते, तर वाद-विवादासाठी ‘एआय (Artificial Intelligence) : शाप की वरदान?’ हा विषय देण्यात आला होता. दोन्ही स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मनमोकळेपणाने विचार मांडत टाळ्यांचा कडकडाट मिळवला.

पाहुण्यांचा परिचय सोनल शर्मा व संगीता वंगा यांनी करून दिला, तर स्पर्धेचे नियम व अटी कल्पना लोंढे व आसिफ शेख यांनी समजावून सांगितल्या.

डॉ. अश्‍लेशा भांडारकर यांनी विद्यार्थ्यांनी प्रत्येक स्पर्धेतून आपली क्षमता विकसित करण्याचे आवाहन केले. प्रा. डॉ. नाबदे यांनी स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन व निर्णयक्षमता विकसित होत असल्याचे सांगितले. मच्छिंद्र देसाई यांनी हिंदी भाषेचे महत्त्व स्पष्ट केले, तर आनंद त्रिपाठी यांनी प्रत्येक विषयाच्या दोन बाजू असल्याचे सांगत योग्य निर्णय घेण्याचे मार्गदर्शन केले.

स्पर्धेनंतर निकाल जाहीर करून उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती हिंगे व रवींद्र उजागरे यांनी, तर आभार अफसर शेख व विशाल भोयर यांनी मानले. अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी विजेत्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

निकाल :

उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा

प्रथम – सहिला दीपक कोकणे (अशोकभाऊ फिरोदिया)

द्वितीय – ओशमी योगेश तवर (सेठ नंदलाल धूत)

तृतीय – अमोघ समीर पळसकर (सेंट विवेकानंद)

उत्तेजनार्थ – पलक तुषार पटेल (सेठ नंदलाल धूत), आर्यन अरुण उगले (श्री साई इंग्लिश मीडियम स्कूल)

वाद-विवाद स्पर्धा

प्रथम – वरद संतोष लोखंडे (अशोकभाऊ फिरोदिया)

द्वितीय – ओशमी योगेश तवर (सेठ नंदलाल धूत)

तृतीय – चैताली महावीर चौगुले (सेठ नंदलाल धूत)

उत्तेजनार्थ – दिव्या झंजाड (सेनापती बापट हायस्कूल), अनन्या (तक्षिला स्कूल)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *