सीसीएमपी रजिस्ट्रेशन प्रकरणी सरकारने तातडीने कारवाई करावी; शिवसेनेची मागणी एमएमसी जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असल्याचा आरोप

अहिल्यानगर | प्रतिनिधी

राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांना सीसीएमपी (Certificate Course in Modern Pharmacology) कोर्सनंतर महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडून (एमएमसी) रजिस्ट्रेशन मिळण्यासाठी न्यायालयाचे स्पष्ट आदेश असूनही एमएमसी जाणीवपूर्वक विलंब करत असल्याचा आरोप शिवसेनेच्या डॉक्टरांनी केला आहे. या संदर्भात डॉ. दिलीप दत्तात्रय पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले असून तातडीने कारवाईची मागणी केली आहे.

डॉ. पवार यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सन 2014 मध्ये राज्य सरकारने होमिओपॅथी डॉक्टरांना ऍलोपॅथी औषधोपचार करण्याची परवानगी देत एक वर्षाचा सीसीएमपी कोर्स सुरू केला. हा कोर्स उत्तीर्ण झालेल्या डॉक्टरांचे रजिस्ट्रेशन महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल ॲक्ट 1965 मधील शेड्युल 28 अंतर्गत स्वतंत्र नोंदणी पुस्तिकेत करण्याची तरतूद असूनही, एमएमसीने अद्यापही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही.

आयएमएने (इंडियन मेडिकल असोसिएशन) या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने कुठेही स्थगिती न देता उलट रजिस्ट्रेशन सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. तरीदेखील आयएमए सरकारवर दबाव आणत मंत्रालयात बैठका घेत असून, यामुळे न्यायालयाचा अवमान होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील 13 कोटी जनतेला होमिओपॅथी डॉक्टरांकडून मिळणाऱ्या वैद्यकीय सेवांमध्ये अडथळा निर्माण होत असल्याचेही पत्रात नमूद केले आहे.

गेल्या दहा वर्षांपासून आयएमए वारंवार अडथळा निर्माण करत असून, यामुळे राज्यातील जवळपास एक लाख होमिओपॅथी डॉक्टरांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हा संघर्ष टाळण्यासाठी एमएमसीने सीसीएमपी रजिस्ट्रेशन तातडीने देण्याचे निर्देश सरकारने द्यावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

या निवेदनावेळी डॉ. राजेंद्र थोरात, डॉ. अशोक भोजने, डॉ. दीपक दरंदले, डॉ. एम. एस. आव्हाड आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *