सीएसआरडीमध्ये शिवजयंती उत्साहात; स्वराज्य, सामाजिक न्याय व एकतेचा संदेश

अहिल्यानगर | २२.२ | प्रतिनिधी

येथील CSRD–ISWR (भा.पां. हिवाळे शिक्षणसंस्था) येथे १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला संचालक प्रा. डॉ. सुरेश पठारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी डॉ. सुरेश मुगुटमल, डॉ. प्रदीप जारे, डॉ. विजय संसारे, आसावरी झपके, डॉ. जेमोन वर्गीस, ट्विंकल ईश्वरी आदी अध्यापकवृंद तसेच विकास कांबळे, शरद गुंडरस, प्रदीप रत्नपारखी, भिवसेन जगताप, मीना शिसवाल, गिरीश शिरसाठ, किरण गिते हे कार्यालयीन सहकारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वराज्य संकल्पनेचे महत्त्व स्पष्ट करताना डॉ. सुरेश पठारे यांनी स्वशासन आणि स्वजबाबदारीच्या माध्यमातून सामाजिक मूल्यवर्धनासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. शिवरायांनी स्वशासनाच्या माध्यमातून भाषा, जमीन आणि संस्कृतीचे रक्षण करत अस्मिता जपली. भेदभाव व अत्याचाराला स्थान न देता सामाजिक न्यायाची पायाभरणी केली, असे त्यांनी नमूद केले.

शिवरायांचे राज्य हे सामाजिक न्यायावर आधारित होते. महिला, बालके, शेतकरी व सामान्य नागरिकांना प्राधान्य देत सुशासनाची संकल्पना रुजविण्यात आली. सामाजिक एकता, सामंजस्य आणि परस्पर धार्मिक आदर या मूल्यांचे जतन करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. सुरेश मुगुटमल यांनी शिवरायांच्या सामाजिक न्याय व समतेच्या शिकवणीचे आचरणात रूपांतर करण्याचे आवाहन केले. डॉ. प्रदीप जारे यांनी सामाजिक कार्य विद्यार्थ्यांनी शिवविचारांवर आधारित रयतेची सेवा करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

एमएसडब्ल्यू द्वितीय वर्ष विद्यार्थीनी शिवानी भगवाने हिने शिवरायांचे चरित्र आणि महिलांविषयक धोरण यावर भाष्य करत स्त्री-सक्षमीकरणाची आवश्यकता स्पष्ट केली. बीजेएमसीचे विद्यार्थी भैरवनाथ वाकळे यांनी शिवरायांच्या राज्यव्यवस्थेचा व लोकशाही संकल्पनेचा थोडक्यात ऊहापोह करून शिवविचारांवर सातत्याने काम करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमात स्वराज्यविचार, प्रशासनकौशल्य, समाजसुधारणा आणि पराक्रम यावर मार्गदर्शनपर भाषणे झाली. विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर आधारित भाषण सादर करून कार्यक्रमात उत्साह निर्माण केला. विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्ये, राष्ट्रभक्ती, शौर्य आणि सामाजिक नेतृत्वगुण विकसित करण्याच्या उद्देशाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

संस्थेच्या वतीने शिवाजी महाराजांचा आदर्श नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येईल, असे सांगण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शॅम्युअल वाघमारे यांनी केले तर आभारप्रदर्शन किशोर ढगे यांनी मानले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *