दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा ‘आनंद सप्ताह’ उत्साहात संपन्न

अहिल्यानगर | प्रतिनिधी

अहिल्यानगर महानगरपालिका शिक्षण विभाग आणि रिमांड होम केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयोजित ‘आनंद सप्ताह’ विविध उपक्रमांनी उत्साहात पार पडला. दिव्यांग विद्यार्थ्यांना संधी, आत्मविश्‍वास आणि कलागुणांना वाव देण्याच्या हेतूने सलग पाच दिवस विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

रिमांड केंद्रातील सर्व शाळांमध्ये चित्रकला, ब्रेल लेखन, गायन, कथाकथन, नाट्यस्पर्धा आणि क्रीडा स्पर्धा उत्साहात राबविण्यात आल्या. चित्रकला स्पर्धेत अल्पदृष्टी विद्यार्थ्यांनी रंगांची उधळण करत सहभाग नोंदवला. तर ब्रेल लिपी लेखन स्पर्धेत अनाम प्रेम संस्थेतील अंध प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्रभावी कामगिरी सादर करून प्रेरणादायी उदाहरण घडवले.

विशेष शिक्षक उमेश शिंदे यांनी सांगितले की, दिव्यांग विद्यार्थ्यांची ऊर्जा, उत्साह आणि स्वतःला सिद्ध करण्याची इच्छा उल्लेखनीय आहे. त्यांच्या सक्रिय सहभागामुळे स्पर्धांचा गाभा अधिक अर्थपूर्ण झाला. विशेष शिक्षक रामेश्‍वर ढगे यांनी क्रीडा स्पर्धांना मिळालेल्या प्रतिसादाचे विशेष कौतुक केले. त्यांनी शाळांच्या नियोजनबद्ध आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.

शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी जुबेर पठाण म्हणाले की, ‘आनंद सप्ताह’ हा दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आनंददायी आणि आत्मविश्‍वास वाढवणारा उपक्रम आहे. त्यांच्या उत्साही सहभागामुळे हा मेळावा अधिक यशस्वी झाल्याचे त्यांनी नमूद केले.

‘आनंद सप्ताह’ अंतर्गत घेतलेल्या सर्व स्पर्धांचे बक्षीस वितरण जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. या उपक्रमाला अनाम प्रेम संस्थेचे अध्यक्ष इं. अजित माने, विश्‍वस्त डॉ. मेघना मराठे, अमृत भुसारी यांचे सहकार्य लाभले. तसेच राहुल खिरोडे, चेतन लांडगे, प्रकाश गजे आणि सुरेखा कोतकर यांची उपस्थिती उल्लेखनीय ठरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *