अहिल्यानगर | प्रतिनिधी
(Games)राष्ट्रीय दृष्टिहीन संघ, महाराष्ट्र राज्य व जिल्हा शाखा अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय अंध मुलांची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा २०२५ अहिल्यानगर जिल्ह्यात मोठ्या उत्साहात पार पडली. ता. १६ ते १८ डिसेंबर २०२५ या कालावधीत झालेल्या या स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यांतील संघांनी सहभाग नोंदवून आपली क्रीडाकौशल्ये सादर केली.
(Games)या स्पर्धेदरम्यान अंध क्रीडापटूंनी दाखवलेली जिद्द, चिकाटी, कौशल्य व संघभावना उपस्थितांच्या विशेष कौतुकास पात्र ठरली. मैदानावर खेळाडूंनी दिलेल्या झुंजार खेळामुळे स्पर्धेला चुरशीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
(Games)स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आयुक्त यशवंत डांगे, नरेंद्र फिरोदिया, सविता काळे, दत्तात्रय जाधव, अनिल मालवे, रामचंद्र सुखटनकर, गोविंद लासुरे, अजित माने, ज्योती कदम, डॉ. बापू कांडेकर व डॉ. प्रकाश कांकरिया यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मैदान व्यवस्था, निवास, भोजन व इतर आवश्यक सुविधा सुयोग्यरीत्या उपलब्ध करून देण्यात आल्या.
समारोपप्रसंगी राष्ट्रीय दृष्टिहीन संघ, महाराष्ट्र राज्य व जिल्हा शाखा अहिल्यानगरचे अध्यक्ष सुभाष शिंदे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, दृष्टिहीन क्रीडापटूंमध्ये प्रचंड आत्मविश्वास व जिद्द आहे. अशा स्पर्धांमुळे त्यांच्या क्रीडागुणांना चालना मिळते आणि समाजात सकारात्मक संदेश पोहोचतो. भविष्यात अंध खेळाडूंसाठी अधिकाधिक क्रीडासंधी उपलब्ध करून देण्यासाठी संघटना कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी महासचिव नितीन पुंडलिक सोनार यांनीही मार्गदर्शन करत विविध संघटनांनी दृष्टिहीन खेळाडूंसाठी अशा प्रकारच्या अधिकाधिक स्पर्धा आयोजित करण्याचे आवाहन केले. या उपक्रमांमुळे खेळाडूंना नवे व्यासपीठ मिळते, आत्मविश्वास वाढतो व त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळतो, असे त्यांनी नमूद केले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल सहभागी सर्व संघ, खेळाडू, प्रशिक्षक तसेच सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचे आयोजकांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.



