मुंबई | २४ फेब्रुवारी | गुरुदत्त वाकदेकर
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) मार्फत राबविण्यात येणारे सर्व स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असून कोणताही कार्यक्रम बंद किंवा ठप्प नसल्याचे संस्थेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या वाढत्या मागणीचा विचार करून काही अभ्यासक्रम २०२६–२७ या आर्थिक वर्षापासून ऑनलाईन स्वरूपात राबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रकल्प संचालकांनी दिली.
महाज्योतीकडून सध्या एकूण ११ प्रकारचे स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जातात. त्यामध्ये संघ लोकसेवा आयोग (यूपीएससी), महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) राज्यसेवा, संयुक्त गट-ब व क तसेच मिलिटरी भरती प्रशिक्षण हे अभ्यासक्रम ऑफलाईन स्वरूपात सुरू आहेत. यूपीएससी प्रशिक्षणार्थींना प्रतिमाह १३,००० रुपये विद्यावेतन व एकवेळ १८,००० रुपये आकस्मिक निधी दिला जातो. एमपीएससी राज्यसेवा, संयुक्त गट-ब व क तसेच मिलिटरी भरती प्रशिक्षणासाठी प्रतिमाह १०,००० रुपये विद्यावेतन व एकवेळ १२,००० रुपये आकस्मिक निधी देण्यात येतो. या आर्थिक सुविधांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
२०२५–२६ मध्ये हजारो विद्यार्थ्यांना लाभ
२०२५–२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा प्रशिक्षणातून २९८, कर्मचारी निवड आयोग प्रशिक्षणातून ४९९, मिलिटरी भरती प्रशिक्षणातून १,५००, एमबीए सीएटी/सीएमएटी/सीईटी प्रशिक्षणातून १,५००, यूजीसी नेट/सीएसआयआर/एमएच-सेट प्रशिक्षणातून १,२००, यूपीएससी प्रशिक्षणातून ४००, एमपीएससी गट-ब व क प्रशिक्षणातून ४००, एमपीएससी राज्यसेवा प्रशिक्षणातून ३००, तर जेईई, एनईईटी व एमएचटी-सीईटी प्रशिक्षणातून ३,५०० विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे.
२०२६–२७ पासून काही अभ्यासक्रम ऑनलाईन
आयबीपीएस पीओ, बँकिंग, रेल्वे, कर्मचारी निवड आयोग (एसएससी), रेल्वे भरती (आरआरबी) आणि एमपीएससी अभियांत्रिकी सेवा या परीक्षांचे स्वरूपच ऑनलाईन असल्याने २०२६–२७ पासून संबंधित प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्याचा प्रस्ताव आहे. या विद्यार्थ्यांना विद्यावेतनाऐवजी टॅबलेट व डेटा सिम देण्यात येणार आहे.
ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योतीकडे एकूण ४४,९०३ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये एमपीएससी अभियांत्रिकीसाठी ४,८३९, एसएससीसाठी १४,४४७, बँकिंग/रेल्वे/एलआयसीसाठी १८,२६५ आणि आरआरबीसाठी ७,३५२ अर्जांचा समावेश आहे. या आकडेवारीवरून विद्यार्थ्यांमध्ये ऑनलाईन प्रशिक्षणाबाबत मोठी उत्सुकता असल्याचे दिसून येते.
विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना २०२१ पासून ऑनलाईन प्रशिक्षण
जेईई, एनईईटी आणि एमएचटी-सीईटीसाठीचे प्रशिक्षण २०२१ पासून ११ वी व १२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना ऑनलाईन दिले जात आहे. या प्रशिक्षणासाठी ४१,८०३ अर्ज प्राप्त झाले होते. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या टॅबलेटचा बॅटरी बॅकअप किमान १२ तासांचा असून, वीज खंडित झाल्यास शिक्षणात व्यत्यय येऊ नये याची दक्षता घेण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरातील नेटवर्कनुसार सिमकार्ड निवडण्याची मुभाही देण्यात आली आहे.
आर्थिक अडचणींमुळे पार्टटाईम नोकरी करणारे विद्यार्थी तसेच घरगुती जबाबदाऱ्यांमुळे शहरात येऊ न शकणाऱ्या गृहिणींनाही दर्जेदार मार्गदर्शन मिळावे, हा ऑनलाईन प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले. ऑनलाईन प्रशिक्षणात लाईव्ह मार्गदर्शन, शंका निरसन सत्रे, साप्ताहिक चाचण्या तसेच पीडीएफ स्वरूपातील नोट्स व पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
एकूणच, महाज्योतीचे कोणतेही प्रशिक्षण बंद नसून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करूनच ऑनलाईन प्रशिक्षणाचा निर्णय घेण्यात आल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे.



