मानवतेचा उत्सव! सीएसआरडी संस्थेचा पुरग्रस्तांना दिलासा देणारा उपक्रम

अहिल्यानगर | जैनवार्ता

शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असताना, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे येणाऱ्या स्वयंसेवी संस्थांमध्ये ग्रामीण विकास व अध्ययन केंद्र (CSRD) समाजकार्य व संशोधन संस्थेने मानवतेचा आदर्श उभा केला आहे. संस्थेने पूरग्रस्त गावांमध्ये जाऊन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत संकटग्रस्तांना दिलासा दिला.

या सामाजिक उपक्रमांतर्गत सीएसआरडीच्या विद्यार्थ्यांनी परिसरात मदतफेरी काढली तसेच समाजमाध्यमांद्वारे जनतेला आवाहन केले. नागरिकांच्या सहकार्याने जमा झालेल्या वस्तूंचे वाटप शेवगाव तालुक्यातील ढोरसडे, अंतरे, मजलेशहर, शहरटाकळी आणि देवटाकळी या गावांमध्ये करण्यात आले.

विशेष म्हणजे, या मदतकार्यादरम्यान कुठलाही बॅनर, जाहिरात किंवा प्रसिद्धी न करता विद्यार्थ्यांनी नि:स्वार्थ भावनेने कार्य केले. या प्रसंगी प्रा. सुरेश मुगुटमल, माजी सरपंच सुभाष वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते विवेक कोल्हे, उपसरपंच चंद्रकांत ठोंबल, मणियल कोल्हे, सचिन चांदणे आणि जिल्हा परिषद शिक्षक संजय काळे उपस्थित होते.

पूरग्रस्तांच्या चेहऱ्यावर आनंदाची झळाळी निर्माण करणारा हा सीएसआरडी संस्थेचा उपक्रम खऱ्या अर्थाने मानवतेचा उत्सव ठरला आहे. संकटाच्या काळात विद्यार्थ्यांनी दाखवलेली संवेदनशीलता, जबाबदारीची जाणीव आणि नि:स्वार्थ सेवा वृत्ती समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. या कार्यातून ‘सेवेचं समाधान हेच खरं समाधान’ हा संदेश त्यांनी कृतीतून दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *