नवभारत विद्यालय देहरे येथील 1994 बॅचचा माजी विद्यार्थी मेळावा दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात संपन्न झाला. तब्बल 31 वर्षांनी सर्व मित्रमंडळी एकत्र येत असल्याने आनंद आणि भावनांचा अनोखा संगम या मेळाव्यात पाहायला मिळाला. हा मेळावा अहिल्यानगर येथील हॉटेल मेघनंद येथे पार पडला. राज्याच्या विविध भागांत कार्यरत असलेले जवळपास सर्वच माजी विद्यार्थी उपस्थित राहिले.
कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम् आणि त्या काळातील दैनिक प्रार्थनेने झाली. प्रास्ताविक राहुल जाधव यांनी केले, तर स्वागताची जबाबदारी चंद्रकांत खजिनदार यांनी पार पाडली. दरम्यानच्या काळात दिवंगत झालेल्या सर्व माजी विद्यार्थी, शिक्षक आणि शाळेतील अन्य कर्मचाऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. श्रद्धांजली प्रस्ताव श्री चांगदेव लांडगे यांनी सादर केला.
मेळाव्यात हास्य–विनोदांनी भरलेले कार्यक्रम, जुन्या आठवणींना उजाळा देणारे किस्से आणि शालेय जीवनातील खेळ यामुळे उपस्थित सर्वजण जुन्या शालेय आठवणींमध्ये रमून गेले. चाळीशीकडे वाटचाल करणारे विद्यार्थी पुन्हा एकदा दहावीतील उत्साहाने भरलेले दिसत होते. दुपारच्या सुट्टीतील जेवणाचा खास आस्वाद घेत सर्वांनी भूतकाळातील क्षण पुन्हा अनुभवले.
अविनाश खजिनदार यांनी अशा मेळाव्यांचे वारंवार आयोजन व्हावे आणि मित्रमंडळींमध्ये एकात्मता व परस्पर सहकार्य वाढावे अशी भावना व्यक्त केली. भविष्यात हा मेळावा दरवर्षी आयोजित करण्याचा निर्णय सर्वांनी एकमताने घेतला. कार्यक्रमादरम्यान काही खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या खेळांच्या विजेत्यांना शालेय जीवनातील बक्षिसांच्या आठवणी जागवत गौरविण्यात आले. सर्व माजी विद्यार्थ्यांना मेळाव्याचे स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाची सांगता छानपैकी चहा–पाण्याने झाली. साईनाथ काळे यांनी सर्व उपस्थित मित्रमंडळींना व गुरुजनांना मनापासून आभार मानले आणि पुढील वर्षी पुन्हा भेटण्याचे आश्वासन दिले. सगळ्यांनी पुढील वर्षी नियमितपणे भेटण्याचा निर्धार करून आनंदाने आपल्या घरी परतले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साईनाथ काळे, अविनाश खजिनदार, चांगदेव लांडगे, चंद्रकांत खजिनदार, राहुल जाधव तसेच सर्व माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या समन्वयाने परिश्रम घेतले.