अहिल्यानगर (प्रतिनिधी)
“इंटरनेटमुळे शिक्षक-विद्यार्थी यांच्यातील अंतर कमी झाले आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षण आणि दैनंदिन जीवन यांची सांगड घालणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षकांनी स्वतःला अपडेट ठेवणे अत्यावश्यक आहे, कारण विद्यार्थी शिक्षकाकडे आदर्श व्यक्ती म्हणून पाहतात,” असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या (माध्यमिक) शिक्षणाधिकारी संध्याताई गायकवाड यांनी केले.
अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे माजी प्रमुख कार्यवाह स्व. अशोकभाऊ फिरोदिया यांच्या जयंतीनिमित्त आयोजित गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभात त्या अध्यक्ष म्हणून बोलत होत्या. या वेळी संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, उपाध्यक्ष अशोक मुथा, सहकार्यवाह गौरव फिरोदिया, खजिनदार प्रकाश गांधी, सल्लागार मंडळ सदस्य आशाताई फिरोदिया, भूषण भंडारी, शैलेश मुनोत, पुष्पाताई फिरोदिया, मिनाताई बोरा, रविंद्र बाकलीवाल, जालिंदर बोरुडे, तसेच विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. संगीत शिक्षक परशुराम मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी ईश्वस्तवन व स्वागतगीत सादर केले.
प्रास्ताविकात छायाताई फिरोदिया यांनी स्व. अशोकभाऊ फिरोदिया यांच्या कार्याची आठवण करून देत सांगितले की, “त्यांच्या दूरदृष्टीमुळे संस्था शैक्षणिक, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात प्रगतीच्या मार्गावर आहे.”
या कार्यक्रमात सोसायटीच्या सर्व शाळांतील 99 गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलने ‘मुख्यमंत्री स्वच्छ शाळा-सुंदर शाळा’ या उपक्रमात तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल शाळेला तीन लाख रुपयांचे बक्षीस मिळाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन पवार व शुभांगी जोशी यांनी केले, तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक अजय बारगळ यांनी केले.
दरम्यान, महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत फटका बसलेल्या 50 पूरग्रस्त कुटुंबांसाठी अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या वतीने 2 लाख रुपये किमतीचे जीवनावश्यक वस्तूसंच (किराणा व भांडी सेट) देण्याचे जाहीर करण्यात आले असून, ही मदत लवकरच वितरित केली जाणार आहे.



