राहुरी कृषीविद्यापीठ | प्रतिनिधी
हरित क्रांतीनंतर हायब्रीड बियाणे व रासायनिक खतांमुळे उत्पादन वाढले असले तरी जमिनीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्याने आज नैसर्गिक शेतीकडे वळण्याची गरज अधिक भासू लागली आहे. पुढील काळात जमिनीचे आरोग्य जपण्यासाठी नैसर्गिक शेतीला प्राधान्य देणे अत्यावश्यक ठरणार असल्याचे मत महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी व्यक्त केले.
पुणे कृषि महाविद्यालयातील मृद विज्ञान विभागाच्या वतीने ‘निरोगी शहरांसाठी निरोगी माती’ या संकल्पनेवर आधारित १२ वा जागतिक मृदा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात डॉ. जालंदर पाटील, डॉ. महानंद माने, डॉ. सुभाष ढाणे, डॉ. अजितकुमार देशपांडे, डॉ. अर्जुन बांगर, डॉ. अशोक पाटील, डॉ. प्रमोद जगताप, आय.सी.आय.सी.आय. फाऊंडेशनचे दिपक पाटील, मिटकॉनचे विशाल डावखर आदी मान्यवर उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. खर्चे म्हणाले, “मागील काही वर्षांत जमिनीचे आरोग्य खालावले असून कार्बनचे प्रमाण धोकादायक पातळीवर कमी होत आहे. याचा फटका केवळ पिक उत्पादनालाच नव्हे, तर मानवी आरोग्यालाही बसत आहे. सेंद्रीय शेती ही नवी नसून जुनी पद्धत आहे; तरी तिच्या अवलंबनाखालील क्षेत्र समाधानकारक नाही. शेतकरी संभ्रमात असून त्यांना योग्य दिशादर्शनाची गरज आहे. यासाठी नैसर्गिक शेतीवर अधिक संशोधन आवश्यक आहे.”
ते पुढे म्हणाले की, शासनाने नैसर्गिक शेतीसाठी अभ्यासक्रम तयार करण्याच्या सूचना दिल्या असून राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांना त्यादृष्टीने काम करावे लागणार आहे. हवामान बदलाशी सुसंगत तंत्रज्ञान, नवीन बियाणे आणि शास्त्रीय पुराव्यावर आधारित संशोधन यावर भर देण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.
कार्यक्रमात डॉ. जालंदर पाटील यांनी शेतीतील एआय तंत्रज्ञान विद्यार्थ्यांनी आत्मसात करून ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे, असे आवाहन केले. मात्र विद्यापीठांतील मोठ्या प्रमाणातील रिक्त पदांमुळे संशोधनाच्या गतीवर परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. सुभाष ढाणे यांनी मातीतील अन्नद्रव्य संतुलनाचे महत्त्व अधोरेखित केले. “रासायनिक खतांचा परिणाम आपण समजतो त्यापेक्षा वेगळा असू शकतो. परदेशात जास्त प्रमाणात रासायनिक खतांचा वापर होतो, तरी त्यांच्या जमिनी अधिक सक्षम दिसतात. आपल्या पिकांच्या विविधतेमुळे मातीतील अन्नद्रव्यांची कमतरता निर्माण होते आणि हेच मोठे आव्हान आहे,” असे ते म्हणाले.
कार्यक्रमाची सुरुवात शंखनाद, दीपप्रज्वलन व भूमाता पूजनाने झाली. प्रास्ताविक डॉ. अविनाश गोसावी यांनी केले. कार्यक्रमातील संशोधन व विस्तार कार्याचा आढावा डॉ. धर्मेंद्र फाळके यांनी मांडला. सूत्रसंचालन डॉ. वृषाली घोरपडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. दिप्ती वाघदरे यांनी केले.



