पांगरमल गावात नुकसानीचे पंचनामे सुरू; भीमराज आव्हाड यांचे उपोषण स्थगित

नगर | प्रतिनिधी

नगर तालुक्यातील पांगरमल गावात पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून संपूर्ण शेती पाण्याखाली गेली आहे. शासनाने पंचनामे करण्याचे आदेश दिले असतानाही गावात पंचनामे न झाल्याने शेतकरी मदतीपासून वंचित राहिले होते. ग्रामसेविका वारंवार गैरहजर राहत असल्याच्या तक्रारींवरून पांगरमलचे माजी सरपंच भीमराज आव्हाड यांनी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकत शेतकऱ्यांसह उपोषणास सुरुवात केली.

यावेळी पांडुरंग आव्हाड, महादेव आव्हाड, नारायण आव्हाड, नवनाथ आव्हाड, नामदेव आव्हाड, बाबुराव वाकडे, अंबादास आव्हाड यांच्यासह गावातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या आंदोलनाची दखल घेत ग्रामवसूल अधिकारी राजेंद्र सांगळे यांनी तातडीने गावात येऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले की पांगरमलमध्ये पंचनामे तातडीने केले जातील आणि कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही.

यानंतर ग्रामसेविका अर्चना आडसुरे, मंडल अधिकारी राम नलवडे, कृषी सहाय्यक डुकरे यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनाम्यांना सुरुवात करण्यात आली. परिणामी श्री. आव्हाड यांनी आपले उपोषण स्थगित केले.

गावात तातडीने पंचनामे सुरू झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *