अहिल्यानगर | प्रतिनिधी
पत्रकारांनी केवळ दैनंदिन बातम्यांपुरते मर्यादित न राहता आपल्या पत्रकारितेचा प्रवास, अनुभव व बदलत्या काळातील निरीक्षणे पुस्तकरूपात समाजासमोर मांडणे आवश्यक आहे. अशा स्वरूपाचे लेखन नवोदित पत्रकारांसाठी मार्गदर्शक ठरेल, तसेच पत्रकारितेचा ऐतिहासिक दस्तऐवज बनेल, असे प्रतिपादन शासनाच्या अधिस्वीकृती नाशिक विभागाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार सुधीर लंके यांनी केले.
मराठी पत्रकार परिषद यांच्या वतीने शहरात पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्षीय भाषण करत होते. यावेळी मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख, शासनाच्या अधिस्वीकृती नाशिक विभागाचे सदस्य विजयसिंह होलम, मराठी पत्रकार परिषदेचे राज्य कोषाध्यक्ष मन्सूर शेख, तसेच रामदास ढमाले, महेश देशपांडे, सुदाम देशमुख, शिरीष कुलकर्णी, प्रकाश कुलकर्णी, रमेश देशपांडे, दिलीप वाघमारे, राजकुमार कटारिया, सुभाष चिंधे, बंडू पवार, सचिन शिंदे, आफताब शेख, राजू खरपुडे, वाजिद शेख, साजिद शेख, बाबा ढाकणे, संजय सावंत, अन्सर सय्यद, गुलाम कादर जहागीरदार, संजय पाठक, राजेंद्र येंडे, सुधीर पवार, जहीर सय्यद, निसार मास्टर, आदिल रियाज शेख, रमीज शेख, नवीद शेख यांच्यासह पत्रकार, वृत्तछायाचित्रकार व विविध माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लंके पुढे म्हणाले की, पत्रकारांनी संवाद, चर्चा व वैचारिक देवाणघेवाणीसाठी एकत्र येणे काळाची गरज आहे. बदलत्या तंत्रज्ञानामुळे पत्रकारितेचे स्वरूप झपाट्याने बदलत असून डिजिटल मीडियाचे महत्त्व लक्षणीयरीत्या वाढले आहे. लोकशाही टिकवण्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे प्रभावी माध्यम म्हणून डिजिटल मीडिया समाजासमोर उभे राहिले असून, शासनानेही या माध्यमांवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. नवोदित पत्रकारांना योग्य प्रशिक्षण व प्रबोधन मिळाल्यास दर्जेदार व जबाबदार पत्रकारिता घडू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अहिल्यानगर जिल्ह्याला पत्रकारितेचा समृद्ध वारसा लाभलेला असून, सामाजिक, राजकीय व प्रशासकीय घडामोडींचे प्रतिबिंब सातत्याने येथे उमटत असते. लोकशाहीचे रक्षण करणारी पत्रकारिता करणारा पत्रकारच खरा पत्रकार असल्याचे सांगत लंके यांनी शासनाच्या अधिस्वीकृतीसंदर्भातील नियमावली, त्याचे फायदे व लाभ घेण्याची प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती दिली.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख यांनी १५० वर्षांपूर्वीच्या व आजच्या पत्रकारितेतील विषयांची सांगड घालून पुढे जाण्याची गरज असल्याचे सांगितले. पत्रकारितेचा समृद्ध वारसा पुढील पिढीकडे सोपवणे ही सामूहिक जबाबदारी असून नवोदित पत्रकारांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या पत्रकारितेतील योगदानावरही प्रकाश टाकला.
विठ्ठल लांडगे यांनी शासनाच्या अधिस्वीकृती नाशिक विभागाचे अध्यक्ष सुधीर लंके व सदस्य विजयसिंह होलम यांच्या कार्याचे कौतुक करत, सर्वसामान्य व ज्येष्ठ पत्रकारांना अधिस्वीकृती मिळवून देण्यासाठी त्यांची सातत्यपूर्ण धडपड सुरू असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमात हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने संजय सपकाळ व संजय चोपडा, तसेच फिनिक्स फाउंडेशनच्या वतीने नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांनी पत्रकारांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश देशपांडे यांनी केले, तर आभार आफताब शेख यांनी मानले.



