अहिल्यानगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील आणि दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध ३ कोटी ४१ लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले. या विकासकामांचा शुभारंभ युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आला.
या विकास प्रकल्पांत पिंपळगाव ते लक्ष्मीनगर डांबरीकरण रस्ता, सटुबाई रोड, भोसले वस्ती येथे ट्रान्सफॉर्मर बसविणे, शहीद भोंदे स्मारक सुशोभीकरण, डोंगरगण नदीवरील बंधारा, अण्णाभाऊ साठे नगर काँक्रिटीकरण, तसेच पंचक्रोशीतील विविध पानंद रस्त्यांचे काम यांचा समावेश असून या सर्व कामांवर एकूण ३ कोटी ४१ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रभाजी सुळ यांनी भूषविले. या वेळी बोलताना अक्षय कर्डिले म्हणाले की,
“ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास हा आमचा ध्यास आहे. स्थानिक पातळीवर अशा विकासकामांना गती मिळाल्यासच खरी समृद्धी शक्य आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आणखी प्रकल्प या भागात राबविण्याचा आमचा प्रयत्न राहील.”
या प्रसंगी पिंपळगाव माळवी सरपंच राधिका प्रभुणे, उपसरपंच मच्छिंद्र झिने, वडगाव गुप्ता सरपंच विजय शेवाळे, मांजरसुंबा सरपंच जालिंदर कदम, मधुकर मगर, मेजर विश्वनाथ गुंड, ग्रामपंचायत सदस्य बापू बेरड, सुधीर गायकवाड, प्रा. देवराम शिंदे तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.