राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका जाहीर; आजपासून आचारसंहिता लागू

१५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल | राज्यात राजकीय हालचालींना वेग

मुंबई | प्रतिनिधी

राज्यातील एकूण २९ महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला असून, राज्यात आचारसंहिता तत्काळ लागू करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. सर्व निवडणुका एकाच टप्प्यात घेण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

नामांकन प्रक्रियेची सुरूवात २३ डिसेंबरपासून

जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार २३ ते ३० डिसेंबर २०२५ या कालावधीत उमेदवारांच्या नामांकन अर्जांचा स्वीकार करण्यात येणार आहे.

३१ डिसेंबर : अर्जांची छाननी

२ जानेवारी २०२६ : उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख

३ जानेवारी : अंतिम उमेदवारांची यादी जाहीर

निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व संबंधित यंत्रणांना आवश्यक निर्देश जारी करण्यात आले आहेत.

१५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल

राज्यात १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून, त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच १६ जानेवारीला मतमोजणी पार पडून निकाल जाहीर करण्यात येतील. राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहणार आहे.

राजकीय हालचालींना वेग

निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी तयारी जोरात सुरू केली आहे. अनेक उमेदवारांनी मतदार संपर्क मोहिमा सुरू केल्या असून, काही ठिकाणी मतदारांच्या घरी डस्टबीण वाटप झाल्याचेही समजते. तर काही वॉर्डांमध्ये पैठण्याचा खेळ आधीच रंगल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

दरम्यान, आचारसंहिता लागू झाल्यानंतर सरकारी यंत्रणांवर निवडणूक आयोगाचे निर्बंध लागू झाले आहेत. विकासकामांची नवीन घोषणांवर बंदी, शासकीय साधनसामग्रीचा वापर थांबविणे यासह विविध नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ही निवडणूक प्रक्रिया राज्यातील शहरी राजकारणाचा पुढील मार्ग निश्चित करणारी ठरणार असून, २९ महापालिकांवरील नियंत्रणासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *