राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सीएसआरडीच्या शुभमची सुवर्णझेप; २०० व ८०० मीटर धावण्यात दुहेरी यश

अहिल्यानगर | प्रतिनिधी

भारतीय युवा खेल परिषद अंतर्गत महाराष्ट्र राज्य युवा खेल परिषद यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत भा. पां. हिवाळे शिक्षण संस्थेच्या सीएसआरडी विभागातील एमएसडब्ल्यू द्वितीय वर्षाचा विद्यार्थी शुभम सीमा अरुण हंबीरराव याने उल्लेखनीय कामगिरी करत २०० मीटर व ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत दुहेरी

सुवर्णपदकाची कमाई केली आहे.

या राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग, सोलापूर येथे ही स्पर्धा अत्यंत उत्साहात पार पडली. स्पर्धेतील विजेत्यांना महाराष्ट्र राज्य युवा खेल परिषदचे संचालक शंकर गायकवाड पाटील यांच्या हस्ते ट्रॉफी व पदक प्रदान करण्यात आले.

शुभम हंबीरराव हा अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील हळगाव येथील शेतकरी कुटुंबातील असून, एकत्र कुटुंबात राहून कठोर परिश्रम व सातत्यपूर्ण सरावाच्या बळावर त्याने हे यश संपादन केले. आई-वडील, आजी-आजोबा, चुलता-चुलती व कुटुंबीयांचा मिळालेला पाठिंबा त्याच्या यशामागे महत्त्वाचा ठरला आहे.

शुभमच्या या उज्ज्वल यशाबद्दल सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे, सर्व प्राध्यापकवर्ग तसेच बीजेएमसी व एमएसडब्ल्यूचे विद्यार्थी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. राज्यस्तरावर मिळवलेल्या या यशामुळे शुभमचे सर्वत्र कौतुक होत असून, सीएसआरडीच्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *