भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज आणि सध्याचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव याने ऑस्ट्रेलियातील आगामी मालिकेपूर्वी श्रद्धेचा आश्रय घेतला. २९ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेपूर्वी सूर्यकुमारने पत्नी दिविशा शेट्टीसह शिर्डी येथील साईबाबा मंदिरात दर्शन घेऊन साईसमाधीसमोर नतमस्तक होत देशाच्या यशासाठी प्रार्थना केली.
“टीम इंडियाला विजय मिळो, तिरंगा पुन्हा उंच फडकावा,” अशा भावनेने सूर्यकुमारने साईबाबांकडे साकडे घातले. क्रिकेटच्या या ‘सूर्या’च्या दर्शनासाठी शिर्डीत उपस्थित भाविकांनी “जय साईराम”च्या घोषणांनी वातावरण भारून टाकले. श्रद्धा आणि क्रीडाभाव यांचा सुंदर संगम घडवत सूर्यकुमारने आपली तयारी आणि आत्मविश्वास दोन्ही सुदृढ केले.
आता तो कांगारूंच्या भूमीवर भारतीय संघाचं नेतृत्व करण्यास सज्ज झाला असून, चाहत्यांच्या अपेक्षा आणि साईबाबांच्या आशीर्वादासह सूर्यकुमार “ऑस्ट्रेलिया मिशन”साठी निघाला आहे.