अमरावती | जैनवार्ता
अमरावती जिल्ह्यात वैचारिक चळवळींचे समन्वयित कार्य सातत्याने व्यापक होत. त्याचाच भाग म्हणून कर्मयोगी संत गाडगेबाबा समाधी मंदिर परिसरात ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांचे ‘संत साहित्यातील संविधान मूल्ये’ या विषयावरील संविधान प्रवचन नुकतेच पार पडले.
या प्रवचनाचे आयोजन डॉ. श्रीराम कोल्हे आणि वासुदेव चौधरी यांच्या अभिनव सामाजिक संघटनेतर्फे करण्यात आले. अलुतेदार–बलुतेदार प्रवर्गातील तब्बल ४४ जातींना एकत्र आणून स्थापन झालेली ही संघटना जातिव्यवस्थेच्या चौकटी मोडून सामाजिक ऐक्यासाठी प्रयत्नशील आहे. एका जातीची संघटना टिकवणे कठीण असताना ४४ विविध समाजघटकांना एका धाग्यात बांधण्याचे हे कार्य विशेष ठरत आहे.
गेल्या वर्षभरात या संघटनेने संत आणि महापुरुषांच्या चरित्रावर आधारित व्याख्यानमाला राबवली. त्याद्वारे सर्व समाजघटकांना संतपरंपरेतील समतेचा संदेश पोहोचवण्याचे कार्य प्रशंसनीय ठरले.
प्रवचनात शामसुंदर महाराज म्हणाले, “संत हे कोणत्याही एका जातीपुरते मर्यादित नव्हते. त्यांच्या साहित्याचा गाभा म्हणजे समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व.” सभागृहात संतांच्या अभंग-ओव्यांच्या माध्यमातून संविधानातील मूल्यांची सांगड प्रभावीपणे घालण्यात आली.
कार्यक्रम सुरळीत, शिस्तबद्ध आणि स्वच्छ वातावरणात पार पडला. उपस्थित वैचारिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या भागातही अशी संविधान प्रवचने आयोजित करण्याची तयारी व्यक्त केली.
“एका वर्षात १०० संविधान कीर्तन करण्याचा माझा संकल्प आहे. अमरावतीचा हा अध्याय त्या संकल्पाला नव प्रेरणा देणारा आहे,” असे शामसुंदर महाराज यांनी सांगितले.



