महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणेमार्फत घेण्यात येणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता 5 वी) आणि पूर्व माध्यमिक (इयत्ता 8 वी) शिष्यवृत्ती परीक्षा 2026 च्या तारखेत बदल करण्यात आला आहे. यापूर्वी 8 फेब्रुवारी 2026 रोजी होणारी ही परीक्षा आता 22 फेब्रुवारी 2026 रोजी राज्यभर एकाच दिवशी आयोजित केली जाणार आहे.
दरम्यान, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) देखील याच दिवशी म्हणजे 8 फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार असल्याचे जाहीर झाले होते. राज्यातील अनेक प्राथमिक व माध्यमिक शिक्षक सीटीईटीला बसणार असल्यामुळे त्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख बदलण्याची मागणी केली होती.
या पार्श्वभूमीवर राज्य परीक्षा परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षेचा दिवस बदलत नवीन तारीख 22 फेब्रुवारी 2026 जाहीर केली आहे. सर्व विद्यार्थी, पालक, शाळा प्रशासन आणि परीक्षा केंद्रांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.