शॉर्टसर्किटमुळे उसाच्या फडाला भीषण आग — शेतकऱ्याचे दीड एकर ऊस जळून खाक!

जामखेड | जैनवार्ता

जामखेड तालुक्यातील जवळा परिसरात आज दुपारी ४ वाजता झालेल्या शॉर्टसर्किटमुळे उसाच्या फडाला भीषण आग लागून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ही घटना गट नं. ६४४/१, मोहसीन सत्तार शेख यांच्या शेतात घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, शेख यांच्या शेतातील उसाचा फड वीजवाहिनीच्या अगदी शेजारी होता. अचानक झालेल्या शॉर्टसर्किटमुळे ठिणग्या उसावर पडल्याने आग लागली. काही मिनिटांतच ज्वाळांनी संपूर्ण फड व्यापला. स्थानिक नागरिक आणि शेजारील शेतकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र ऊस सुकलेला असल्याने आग झपाट्याने पसरली.

सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. तथापि, सुमारे दीड एकर ऊस जळून खाक झाल्याने शेख यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत शेतकऱ्याने सरकारकडून नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.

घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाचे तलाठी घोडगे, कृषी सहायक बोलभाट, तसेच रवी बनते, आणि महावितरणचे अधिकारी — सहायक अभियंता ताटे, गोरे, आणि मयुर कथले आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले व पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *