स्व. ओमप्रकाश मंत्री यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ‘रुग्णोपयोगी साहित्य बँक’चे लोकार्पण

अहिल्यानगर (पाथर्डी ) | प्रतिनिधी

सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत कोणत्याही वयोगटातील व्यक्तीच्या आरोग्याची हमी देता येत नाही. रुग्णोपयोगी साहित्य सहज उपलब्ध व्हावे या उद्देशाने ग्रामपातळीवर साहित्य बँका सुरू व्हाव्यात, असे मत जिल्हा माहेश्वरी सभेचे जिल्हाध्यक्ष मनीष बाहेती यांनी व्यक्त केले. जिल्हा सभेच्या पुढाकाराने माजी जिल्हाध्यक्ष स्व. ओमप्रकाश मंत्री यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ‘रुग्णोपयोगी साहित्य बँक’चे लोकार्पण करण्यात आले.

माहेश्वरी समाजाच्या अन्नकूट कार्यक्रमावेळी (ता. २६) सागर मंत्री यांनी स्व. ओमप्रकाश मंत्री यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ फोल्डिंग बेड, रिमुव्हेबल बेड, वॉटर बेड, एअर बेड, व्हीलचेअर, कमोड चेअर, वॉकर आदी साहित्य किट उपलब्ध करून दिले. ज्येष्ठ नेते अशोक बाहेती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश कार्य समिती सदस्य दिलीप मुंदडा, जिल्हा संघटना प्रमुख अशोक मंत्री, श्रीकांत जाजू, आधार सेवाभावी संस्थेचे संस्थापक मुकुंद लोहिया, महिला आघाडीच्या जया डागा व युवक आघाडीचे गोविंद लाहोटी उपस्थित होते.

शहरात सध्या आधार संस्था, डागा परिवार आणि अन्य सामाजिक संस्थांकडून गरजूंना साहित्य उपलब्ध केले जाते. वापरानंतर साहित्य पुन्हा जमा करण्याची सोय असल्यामुळे अधिकाधिक रुग्णांना याचा लाभ मिळतो. या उपक्रमामध्ये आता माहेश्वरी जिल्हा सभेचे योगदानही महत्त्वाचे ठरणार आहे. साहित्य बँकेत आणखी वाढ करण्याचा निर्धार समाज बांधवांनी व्यक्त केला आहे.

यावेळी बोलताना बाहेती म्हणाले की, वाढती महागाई आणि वैद्यकीय उपचारांवरील प्रचंड खर्चामुळे साधारण कुटुंबांना रुग्णोपयोगी साहित्य घेणे जवळपास अशक्य बनले आहे. दीर्घकाळ उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी महागडे साहित्य ही मोठी अडचण ठरते. रुग्ण बरा झाल्यानंतर हे साहित्य पुढे कसे वापरायचे या प्रश्नातूनच साहित्य बँकेची संकल्पना उदयास आली. समाजकार्याची सांगड ही सामूहिक सहभागातून घातल्यास अशा उपक्रमांना बळ मिळते.

दानशूर समाज म्हणून माहेश्वरी समाजाची ओळख सर्वत्र आहे. स्व. ओमप्रकाश मंत्री यांनी आयुष्यभर समाजकार्याची परंपरा जपली आणि तोच वारसा त्यांच्या कुटुंबीयांकडूनही चालू ठेवला जात आहे. या उपक्रमामुळे रुग्णांना आपल्या कुटुंबीयांकडूनच सेवा मिळत असल्याची भावनिक जोड निर्माण होते, असेही बाहेती म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीकांत जाजू यांनी केले. सूत्रसंचालन महेश बाहेती यांनी तर आभार प्रदर्शन अविनाश मंत्री यांनी केले. महाआरतीनंतर अन्नकूट प्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *