‘यलो अलर्ट’चा इशारा! अहिल्यानगर जिल्ह्यात २२ ते २६ ऑक्टोबरदरम्यान मुसळधार पावसाची शक्यता

अहिल्यानगर | प्रतिनिधी

भारतीय हवामान विभागाने २२ ते २६ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. या काळात वीजांचा कडकडाट, जोरदार वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.

नद्यांतील पाणीपातळीत वाढ; पूरस्थितीचा धोका

पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांतून विसर्ग वाढल्याने नद्यांची पातळी झपाट्याने वाढत आहे. भिमा, गोदावरी, मुळा, सीना आदी नद्यांच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून आवाहन करण्यात आले आहे.

सध्या भिमा नदीवर दौंड पूल येथे २,७१७ क्युसेक, गोदावरीवरील नांदूर मध्यमेश्वर धरणातून १,६१४ क्युसेक, जायकवाडी धरणातून ३,१४४ क्युसेक, मुळा धरणातून ५०० क्युसेक, घोड धरणातून १०० क्युसेक, सीना धरणातून १,०३० क्युसेक आणि विसापूर धरणातून १८६ क्युसेक विसर्ग सुरू आहे.

प्रशासनाच्या सूचना नागरिकांसाठी

विजांचा कडकडाट किंवा वादळीवाऱ्याच्या वेळी झाडाखाली किंवा टॉवरजवळ थांबू नये.

वीजेच्या वेळेस विद्युत उपकरणांचा वापर टाळावा आणि धातूच्या वस्तूंशी संपर्क करू नये.

जाहिरात फलक, विद्युत खांब किंवा लोंबणाऱ्या केबल्सजवळ थांबणे धोकादायक ठरू शकते.

मोकळ्या जागेवर असल्यास गुडघ्यावर बसून डोके हातांनी झाकावे आणि जमिनीशी कमी संपर्क ठेवावा.

धरण, नदी किंवा ओढ्यांमध्ये उतरू नये. धोकादायक ठिकाणी सेल्फी घेणे टाळावे.

पूरस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.

मोडकळीस आलेल्या किंवा जुनाट इमारतीत थांबू नये.

डोंगर, घाट किंवा पायथ्याच्या भागात राहणाऱ्यांनी भूस्खलनाचा धोका लक्षात घेऊन सतर्क राहावे.

जनावरांनाही सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे.

आपत्कालीन संपर्क

जिल्हा नियंत्रण कक्षाचा टोल-फ्री क्रमांक – १०७७,

तर दूरध्वनी क्रमांक – ०२४१-२३२३८४४ / २३५६९४० उपलब्ध आहेत.जिल्हा प्रशासनाने नागरिकांना इशारा देत “सावध रहा, सुरक्षित रहा” असा संदेश दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *