अहिल्यानगर | प्रतीनिधी
धावपळीच्या जीवनात आरोग्य हेच खरे धन असून वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे. मधुमेह, हृदयविकार, थायरॉईड यांसारख्या आजारांची वेळेत तपासणी न झाल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. उपचाराबरोबरच समाजात आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे हेच आमचे ध्येय आहे. पैगंबरांच्या शिकवणीनुसार इतरांची सेवा करणे म्हणजेच खरे इबादत आहे. या शिबिराला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आमच्यासाठी प्रेरणादायी असून भविष्यातही असे उपक्रम राबवले जातील, असे प्रतिपादन डायबेटोलॉजिस्ट व हृदयरोग तज्ञ डॉ. अशफाक पटेल यांनी केले.
पैगंबर जयंतीनिमित्त पटेल स्पेशालिटी क्लिनिकच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात रुग्णांना विविध तपासण्या मोफत करून देण्यात आल्या. विशेषतः थायरॉईड, एचडी-वन सी (तीन महिन्यातील साखर), कोलेस्टेरॉल, रक्तातील साखर आदी महत्त्वपूर्ण तपासण्या रुग्णांना विनामूल्य करण्यात आल्या.
या प्रसंगी डॉ. अशफाक पटेल यांच्यासह प्रकाश मुनोत, तुषार वर्पे, आकाश हिवाळे, विक्रम मार्कंड, हर्षल मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. शिबिराचा लाभ मोठ्या संख्येने रुग्णांनी घेतला. नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व अधोरेखित करत जनजागृती करण्यात आली.
रुग्णांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करून डॉ. पटेल व पटेल स्पेशालिटी क्लिनिकचे मनःपूर्वक आभार मानले.



