जायंट्स ग्रुपच्या वतीने राष्ट्रीय आयुर्वेद दिन उत्साहात साजरा; आयुर्वेद तज्ञांचा गौरव

अहिल्यानगर | प्रतिनिधी

 

जायंट्स ग्रुप ऑफ अहिल्यानगर आणि अजय मेडिकल यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय आयुर्वेद दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या पुढाकारातून दरवर्षी 23 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय आयुर्वेद दिवस साजरा केला जातो. जायंट्स सप्ताहाच्या निमित्ताने हा उपक्रम पार पडला.

 

या कार्यक्रमात आयुर्वेद क्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी सिनेट प्रतिनिधी व 25 वर्षांपासून अध्ययन करणारे गुणे आयुर्वेद हॉस्पिटलचे आयुर्वेद तज्ञ डॉ. संजय पुंड, आयुर्वेदिक एजन्सीचे संचालक व 50 वर्षांचे योगदान देणारे अशोक शर्मा, केमिस्ट संघटना व जायंट्स ग्रुपचे माजी अध्यक्ष अनिल गांधी (40 वर्षांची सेवा), महाराष्ट्र आयुर्वेद संघटनेचे संचालक सुधाकर बोरुडे, तसेच कनक आयुर्वेदिक एजन्सीचे भोंजाळ यांचा जायंट्स वेल्फेअर फाउंडेशनचे स्पेशल कमिटी सदस्य संजय गुगळे व सचिव अमित मुनोत यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

 

डॉ. संजय पुंड म्हणाले, “आयुर्वेदाचे मुख्य उद्दिष्ट निरोगी लोकांच्या आरोग्याचे रक्षण करणे हे आहे. चांगले आरोग्य राखण्यासाठी आयुर्वेदाने दिलेला महत्त्वाचा मंत्र म्हणजे ‘भुकेनुसार खा’. पंचकर्म ही शरीरातील वाढलेले दोष शास्त्रशुद्ध पद्धतीने बाहेर काढण्याची अनोखी पद्धत आहे. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत, हवामानातील अनपेक्षित बदल, चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, व्यायामाचा अभाव आणि मानसिक ताणतणावामुळे अनेक नवीन आजार उद्भवतात. अशा परिस्थितीत जगासाठी आयुर्वेद ही भारताची अमूल्य देणगी आहे.”

 

संजय गुगळे म्हणाले, “जायंट्स सप्ताह हा केवळ उत्सव नसून समाजासाठी काहीतरी सकारात्मक घडवण्याचा प्रयत्न आहे. राष्ट्रीय आयुर्वेद दिनाचे औचित्य साधून आयुर्वेद क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. आयुर्वेद हा केवळ आजारांवर उपचार करणारा शास्त्र नसून निरोगी राहण्यासाठी जीवनशैली कशी असावी याचे मार्गदर्शन करणारी प्राचीन पद्धत आहे. आयुर्वेदाच्या मदतीने प्रत्येक घरात निरोगी कुटुंब घडू शकते.”

 

जायंट्स सप्ताहात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यात रक्तदान शिबिर, जनावरांच्या आरोग्य तपासणी शिबिर, महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर, वृक्षारोपण, महानुभाव आश्रम येथे अन्नदान, जिजामाता प्राथमिक आरोग्य केंद्रास रक्तदाब मोजण्याचे मॉनिटर प्रदान करणे तसेच गुटखा, तंबाखू व सिगारेटच्या दुष्परिणामांबाबत जनजागृतीसाठी पोस्टरचे विमोचन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *