आनंद पार्श्व गुरुकुल नेत्र तपासणी शिबिर संपन्न; १४० विद्यार्थ्यांनी घेतला लाभ

अहिल्यानगर | प्रतिनिधी

श्री आनंद पार्श्व गुरुकुल येथे आनंद नवकार परिवार ट्रस्ट, महाराष्ट्र प्रवर्तक कुंदनऋषी म. सा. व संस्कार प्रेमी प. पू. आलोकऋषी म. सा. यांच्या आशीर्वादाने, तसेच डॉ. सुधा प्रकाश कांकरिया व साई सूर्या नेत्र सेवा यांच्या सहकार्याने शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले.

सध्याच्या डिजिटल युगात विद्यार्थी मोबाईल, कॉम्प्युटर आणि टीव्हीचा मोठ्या प्रमाणावर वापर करत असल्यामुळे डोळ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे शिबिर अत्यंत महत्त्वाचे ठरले. ता. २५ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी १२.३० या वेळेत घेतलेल्या या शिबिराचा लाभ सुमारे १४० विद्यार्थ्यांनी घेतला.

शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी प्राचार्या कादंबरी सूर्यवंशी, मेघा बोरा व साई सूर्या नेत्र तपासणी डॉक्टरांची टीम उपस्थित होती. डॉक्टरांच्या वैद्यकीय पथकाने विद्यार्थ्यांची दृष्टी तपासणी (Vision Test), रिफ्रॅक्शन एरर (Refraction Error) निदान व डोळ्यांच्या सामान्य समस्यांबाबत मार्गदर्शन केले. ज्या विद्यार्थ्यांना चष्म्याची गरज असल्याचे निदान झाले, त्यांची नोंद घेऊन त्यांना सवलतीच्या दरात किंवा मोफत चष्मा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले.

या वेळी शरद टिमकरे यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली व आयोजक व वैद्यकीय पथकाचे आभार मानले. आरोग्य पथकाने विद्यार्थ्यांना डोळ्यांची काळजी घेण्याचे उपाय, डिजिटल स्क्रीन वापरताना घ्यावयाची दक्षता व योग्य आहाराविषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.

या उपक्रमामुळे पालकांनी समाधान व्यक्त केले तसेच शाळेच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. श्री आनंद पार्श्व गुरुकुलने अशा आरोग्यविषयक उपक्रमांचे भविष्यातही आयोजन करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *