अहिल्यानगर जिल्हाव्यापी महिला परिषद रविवारी — पन्नास वर्षांच्या स्त्री चळवळीचा सखोल आढावा; १२ ऑक्टोबर रोजी सीएसआरडी सभागृहात महाराष्ट्र स्त्रीमुक्ती परिषदेच्या वतीने आयोजन

अहिल्यानगर | जैनवार्ता

अहिल्यानगर येथे येत्या रविवारी, १२ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हाव्यापी महिला परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र स्त्रीमुक्ती परिषद, अहिल्यानगर आणि ग्रामीण विकास अभ्यास केंद्र (सीएसआरडी) यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद सीएसआरडी सभागृहात सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत होणार आहे.

या परिषदेचे उद्घाटन सीएसआरडीचे प्राचार्य डॉ. सुरेश पठारे यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी जेष्ठ स्त्रीवादी कार्यकर्त्या ॲड. निशा शिबूरकर असतील.

पन्नास वर्षांच्या स्त्री चळवळीचा आढावा

सन १९७५ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने आंतरराष्ट्रीय महिला वर्ष घोषित केले होते. त्या घोषणेला यंदा ५० वर्षे पूर्ण होत असल्याने या परिषदेचे विशेष महत्त्व आहे. गेल्या अर्धशतकात स्त्रियांच्या चळवळींमुळे समाजव्यवस्थेत, कायद्यात आणि सरकारी धोरणांमध्ये मोठे बदल झाले.

या बदलांचा आढावा घेऊन पुढील काळातील स्त्री चळवळीची दिशा ठरवण्यासाठी महाराष्ट्रातील विविध स्त्रीवादी संघटना आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन “महाराष्ट्र स्त्रीमुक्ती परिषद” हा राज्यव्यापी मंच स्थापन केला आहे. या मंचाच्या वतीने वर्षभर राज्यभर विविध उपक्रम राबवले जात आहेत.

विविध विषयांवर मान्यवरांचे मार्गदर्शन

अहमदनगर जिल्ह्यातील स्त्रीवादी कार्यकर्त्यांनी अलीकडेच सार्वजनिक वाहतुकीतील महिलांच्या सुरक्षिततेचा अभ्यास पूर्ण केला असून, त्या अनुषंगाने अनेक विषय या परिषदेत चर्चिले जाणार आहेत.

दिवसभर चालणाऱ्या या परिषदेत —

१)गेल्या पन्नास वर्षातील स्त्री चळवळीचा आढावा

२)भारतीय संविधाना समोरील आक्रमक राष्ट्रवादाचे आव्हान

३)स्त्रियांवरील हिंसेचे विविध पैलू

४)जिल्ह्यातील बेपत्ता झालेल्या मुलींचा प्रश्न

५)महाराष्ट्र स्त्रीमुक्ती परिषदेच्या पुढील मोहिमा

या विषयांवर सखोल चर्चासत्रे आयोजित करण्यात आली आहेत.

प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मनीषा गुप्ते, कॉम्रेड लता भिसे, साथी रमेश अवस्थी या प्रख्यात स्त्रीवादी कार्यकर्त्यांची उपस्थिती राहणार आहे.जिल्हाभरातून महिलांचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित

अहिल्यानगर जिल्ह्यातील तसेच शहरातील सर्व महिला संघटना, कार्यकर्त्या आणि विद्यार्थिनींना परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन नीलिमा जाधव बंडेलू, कॉम्रेड स्मिता पानसरे, संध्या मेढे, ॲड. निर्मला चौधरी, सरोज आल्हाट, मदिना शेख, ॲड. मीनल देशमुख, सत्यभामा थिटमे आदींनी केले आहे.

अधिक माहितीसाठी

संपर्क : संध्या मेढे – ७७०९९ ८५५५५

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *