अहमदनगर महाविद्यालयाच्या करिअर कट्टा आणि विद्यार्थी विकास मंडळाच्या संयुक्त विद्यमाने पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना उच्च प्रतीच्या शालेय बॅग, स्टील वॉटर बॉटल, एक्झाम पॅड, फोल्डर, रजिस्टर, पेन-पेन्सिल, खोडरबर यांसह आवश्यक साहित्याचे किट वितरित करण्यात आले.
प्रभारी प्राचार्य डॉ. नोएल पारगे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, “शिक्षण हे केवळ ज्ञान देणारे माध्यम नसून, सामाजिक बांधिलकी आणि संवेदनशीलता विकसित करणारे साधन असावे.” त्यांनी विद्यार्थ्यांना समाजाशी नाळ जोडणारे, विचारशील आणि कृतीशील व्यक्तिमत्व घडवण्याचे आवाहन केले.
‘करिअर कट्टा’ या अभिनव उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी मदत फेरी आयोजित करून संकलित निधीतून ही मदतकार्य मोहीम राबवली. या उपक्रमाचे संस्थापक अध्यक्ष यशवंत शितोळे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. भागवत परकाळ यांनी केले. यावेळी भा. पां. हिवाळे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर. जे. बार्नबस, सचिव विशाल बार्नबस, उपप्राचार्य प्रा. दिलीपकुमार भालसिंग, डॉ. सय्यद रज्जाक, डॉ. प्रसाद लांबरूड, सुरेश घुले, अभिजीत कुलकर्णी, डॉ. प्रशांत फुगनर, प्रा. प्रतुल कसोटे आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमाच्या यशासाठी सुमित कोतकर, यश कच्छवा आणि वसीम शेख यांनी विशेष नियोजन आणि समन्वय साधला.
महाविद्यालय प्रशासनाने सांगितले की, अशा सामाजिक संवेदनशील उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते.