पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदना ओळखून त्यांना मदत करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करताना “विद्यार्थ्यांनी सामाजिक भावना जपण्यास पुढे आले पाहिजे,” असे प्रतिपादन जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांनी केले.
अहिल्यानगर येथील आयएमएस व्यवस्थापन संस्था वतीने करंजी गावातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला ॲड. गोरख पालवे, करंजी गावचे सरपंच रफिक शेख, संस्थेचे संचालक डॉ. एम.बी. मेहता, उपसंचालक डॉ. विक्रम बार्नबस, व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. प्रोनोती तेलोरे, संगणक विभाग प्रमुख डॉ. महेश पोतदार आदी मान्यवर उपस्थित होते. शेतकरी, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी झाले.
संस्थेच्या कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मिळून अठ्ठेचाळीस हजार रुपयांची मदत जमा केली. त्यापैकी पंचवीस शेतकऱ्यांना प्रत्येकी ३० किलो गहू वाटप करण्यात आले, तर उर्वरित रकमेचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी निवासी उपजिल्हाधिकारी गीते यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. तसेच एन.एम. सथ्था ट्रस्टच्या वतीने पाच हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला.
डॉ. मेहता यांनी स्वागतपर भाषणात सांगितले की, “आपल्याला इतरांच्या दु:खाची जाणीव झाली पाहिजे, तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने समाजसेवा करू शकतो.”
गीते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले, “आज तुम्ही विद्यार्थी आहात, पण भविष्यात जेव्हा मोठ्या पदावर काम कराल तेव्हा समाजाप्रती जबाबदारीचे भान ठेवा. शासन एकटे सर्व करू शकत नाही; लोकसहभाग तितकाच महत्त्वाचा आहे.”
करंजी गावाचे सरपंच रफिक शेख यांनी गावातील नुकसानीचा आढावा सादर करताना मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे नियोजन आणि सूत्रसंचालन प्रा. विजय शिंदे व सी.डी. मोहिते यांनी केले.