TIFR च्या संशोधन बलूनचा प्रवास महाराष्ट्रात; अहिल्यानगर जिल्ह्यासह अनेक भागांना सतर्कतेचे निर्देश

अहिल्यानगर | जैनवार्ता

हैदराबाद येथील टाटा मूलभूत संशोधन संस्था (TIFR) यांच्या वतीने ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीत वैज्ञानिक संशोधनासाठी हवेतील बलून उड्डाणे करण्यात येणार आहेत. या बलूनमधील काही उपकरणे अहिल्यानगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पडण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

या संशोधन उपक्रमाला भारत सरकारच्या परमाणु ऊर्जा विभाग आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) यांचे सहकार्य लाभले आहे. ही बलून उड्डाणे हैदराबाद येथील ईसीआयएल परिसरातून होणार असून एकूण दहा बलून आकाशात झेपावतील. प्रत्येक बलूनचा व्यास ५० ते ८५ मीटर असून ते हायड्रोजन वायूने भरलेले असतील. उड्डाणाची वेळ रात्री ८ ते सकाळी ६.३० अशी असेल.

या बलूनमधील वैज्ञानिक उपकरणे ३० ते ४२ किलोमीटर उंचीपर्यंत प्रवास करतात आणि काही तास संशोधन करून पॅराशूटच्या सहाय्याने जमिनीवर उतरतात. वाऱ्याच्या दिशेनुसार ही उपकरणे २०० ते ३५० किलोमीटर अंतरावर येऊ शकतात. त्यामुळे ती महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांतील विविध भागांमध्ये उतरू शकतात.

महाराष्ट्रातील औरंगाबाद, बीड, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, सांगली, सातारा, अहिल्यानगर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, जळगाव आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये उपकरणे पडण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, ज्या ठिकाणी ही उपकरणे सापडतील ती हलवू नयेत, उघडू नयेत किंवा छेडछाड करू नये. संबंधित पॅकेजवरील पत्त्यावर किंवा जवळच्या पोलीस ठाण्याला व प्रशासनाला त्वरित माहिती द्यावी. उपकरणे सुरक्षित असली तरी त्यामध्ये संवेदनशील वैज्ञानिक साधने असल्याने छेडछाड झाल्यास महत्त्वपूर्ण संशोधनात्मक माहिती नष्ट होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे.

टाटा मूलभूत संशोधन संस्था अशा उपकरणांची माहिती देणाऱ्या नागरिकांना योग्य बक्षीस व खर्चाची भरपाई देणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच या प्रयोगांविषयीची माहिती गावपातळीपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश महाराष्ट्र शासनाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

पहिले बलून उड्डाण ऑक्टोबरच्या चौथ्या आठवड्यात होण्याची शक्यता असून नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *