केडगाव येथील ‘सावली’ संस्थेतील निराधार व गरजू विद्यार्थ्यांना प्रयास ग्रुप आणि नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने शैक्षणिक साहित्य, अल्पोपहार, फळे आणि चॉकलेटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाने निराधार मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आणि परिसरात भावनिक वातावरण निर्माण झाले.
या कार्यक्रमात प्रयास ग्रुपच्या संस्थापिका अलका मुंदडा तसेच दादी-नानी ग्रुपच्या अध्यक्षा जया गायकवाड, उज्वला बोगावत, मीरा पाटील, सावली संस्थेचे संस्थापक नितेश बनसोडे, बुरुडगाव जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका आरती थोरात, तसेच लला डेंगळे, लीला अग्रवाल, पुनम अग्रवाल, सविता धामट, ज्योत्स्ना कुलकर्णी, ज्योती जोशी, राखी जाधव, रेखा मैड, जयश्री पुरोहित, मेघना मुनोत, लता आंबेकर, शुभांगी भोयर, विमल साठे, रोहिणी पवार, विद्या कुलकर्णी, सुजाता कदम, नीलिमा पवार, सुरेखा जंगम, रेखा फिरोदिया आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या
नितेश बनसोडे म्हणाले,“गरजू घटकांना मदत करणे ही मोठी गोष्ट आहेच, पण त्यांना जिव्हाळ्याने जवळ घेणे आणि प्रेम देणे हेच त्यांच्या समाधानाचे खरे कारण ठरते. प्रयास आणि नम्रता दादी-नानी ग्रुपच्या महिलांनी या मुलांना मातृत्वाचा जिव्हाळा दिला, हे कौतुकास्पद आहे. प्रयासच्या माध्यमातून मागील तीन दशकांपासून महिला सक्षमीकरण आणि सामाजिक कार्य सुरु आहे.
“मीरा पाटील यांनी सांगितले,“निराधार मुलांना आपण अनेकदा समाजापासून दूर समजतो, परंतु ते आपल्या समाजाचाच भाग आहेत. त्यांना प्रेम, आधार आणि प्रोत्साहनाची गरज आहे. प्रत्येकाने त्यांच्याकडे आपलेपणाने पाहिले, तर त्यांचे आयुष्य उजळेल.”जया गायकवाड म्हणाल्या,
“आमच्या ग्रुपच्या महिला फक्त मनोरंजनासाठी नव्हे, तर सामाजिक जबाबदारीतून समाजासाठी काहीतरी करण्याच्या भावनेने कार्य करतात. ‘सावली’ संस्थेतील लहानग्यांना प्रेमाने जवळ करताना मातृत्वाचा खरा अर्थ उमगला.”
या उपक्रमादरम्यान महिलांनी मुलांशी प्रेमाने संवाद साधला, त्यांना प्रोत्साहन दिले. विद्यार्थ्यांना मिळालेल्या शैक्षणिक साहित्य, फळे आणि चॉकलेटमुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला.
मुलांच्या चेहऱ्यावरील निरागस हास्य पाहून उपस्थितांच्या डोळ्यांतही आनंदाश्रू चमकले.