शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांच्या अमृत महोत्सव सोहळ्याचे आयोजन शुक्रवार, १४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता रेल्वे स्टेशन रोडवरील सहकार सभागृहात करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे अमृत महोत्सव गौरव समिती व गणित विभाग माजी विद्यार्थी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
कार्यक्रमात रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री ना. शरद पवार यांच्या हस्ते डॉ. निमसे यांचा शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. एन. के. ठाकरे (संस्थापक कुलगुरू, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव) असतील.
तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार निलेश लंके, आमदार संग्राम जगताप, तसेच मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे उपस्थित राहणार आहेत.
या प्रसंगी डॉ. निमसे यांच्या शैक्षणिक, सामाजिक, संशोधनात्मक कार्यावर आणि ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी केलेल्या योगदानावर विशेष प्रकाश टाकण्यात येईल.
अमृत महोत्सवानिमित्त त्यांच्या जीवनकार्याचा वेध घेणारा “कुलगुरू” (संपादक – प्रा. गणेश भगत) तसेच “शिक्षण आणि विकास” (संपादक – डॉ. सर्जेराव निमसे व प्रा. गणेश भगत) या दोन ग्रंथांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
हे ग्रंथ शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक आणि संशोधकांसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
डॉ. निमसे यांनी आपल्या ४४ वर्षांच्या शैक्षणिक कारकिर्दीत ग्रामीण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रेरित केले, संशोधनाला चालना दिली आणि शिक्षण क्षेत्रात नवचैतन्य निर्माण केले.
त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि लखनौ विद्यापीठ या दोन प्रतिष्ठित विद्यापीठांचे कुलगुरूपद भूषविले आहे.
तसेच त्यांनी इंडियन सायन्स काँग्रेसचे अध्यक्षपद आणि पुणे विद्यापीठातील विविध समित्यांवर कार्य केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी, संशोधक आणि शिक्षक घडले आहेत.
या अमृत महोत्सव सोहळ्यास देशभरातील १७ आजी-माजी कुलगुरू, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि माजी विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमस्थळावर पोहोचण्यासाठी नगर–पुणे महामार्गावरील कामांमुळे उपस्थितांना मार्केटयार्ड येथील महात्मा फुले चौक मार्गे येण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
उपस्थित राहणारे कुलगुरू :डॉ. अशोक कोळसकर, डॉ. शिवाजीराव कदम, डॉ. माणिकराव साळुंखे, डॉ. एस. एन. पठाण, डॉ. एन. जे. पवार, डॉ. वासुदेव गाडे, डॉ. भूषण पटवर्धन, डॉ. उद्धव भोसले, डॉ. भरतकुमार आहुजा, डॉ. जयंत वैंशपायन, डॉ. अरविंद दीक्षित, डॉ. मनोज दीक्षित, डॉ. अनिल शुक्ला, डॉ. उपेंद्र द्विवेदी, डॉ. मनोहर चासकर, डॉ. के. बी. पाटील आणि डॉ. ज्ञानदेव म्हस्के.