वाबळे दांपत्याच्या महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ४०० नागरिकांची तपासणी, २०० जणांना मोफत चष्म्यांचे वाटप

अहिल्यानगर | जैनवार्ता

गुलमोहर रोडवरील आम्रपाली गार्डन येथे माजी सैनिक मनसुख वाबळे आणि शालिनी वाबळे यांच्या वतीने आयोजित विनामूल्य महाआरोग्य शिबिराला स्थानिक नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आरोग्यजागृतीच्या उद्देशाने घेण्यात आलेल्या या उपक्रमाचा सुमारे ४०० नागरिकांनी लाभ घेतला असून, २०० नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले.

शिबिरात बालरोगतज्ज्ञ डॉ. रामदास बांगर, डॉ. राहुल पंडित, डॉ. अतुल खालकर, डॉ. अरविंद अनचवले, नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रफुल चौधरी, डॉ. अमित करडे यांच्यासह माजी सैनिक मनसुख वाबळे, शालिनी वाबळे आणि सागर वाबळे उपस्थित होते.

नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व स्पष्ट करताना डॉ. रामदास बांगर म्हणाले, “आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत अनेकजण आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. आजार वाढल्यानंतर उपचार करण्यापेक्षा नियमित तपासणी करणे अधिक आवश्यक आहे. अशा शिबिरांमुळे नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता वाढते.”

शिबिरात अस्थिरोग, स्त्रीरोग, पोटाचे विकार, बालरोग, नेत्रतपासणी तसेच रक्त तपासणीसाठी नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती होती. मोफत चष्मे वाटप सेवा हे शिबिराचे विशेष आकर्षण ठरले.

या उपक्रमासाठी वाबळे मित्रमंडळ, भारतीय माजी सैनिक संघटना आणि नगर जिल्हा माजी सैनिक संघटना यांचे सहकार्य लाभल्याची माहिती आयोजक मनसुख वाबळे आणि सौ. शालिनी वाबळे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *