श्रृती मनवेलीकर यांचा अनोखा सामाजिक वसा; सावली संस्थेतील अनाथ मुलीच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी स्वीकारली

अहिल्यानगर | जैनवार्ता

केडगावमधील सावली संस्थेत राहणाऱ्या एका अनाथ मुलीच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने सामाजिक कार्यकर्त्या श्रृती विक्रांत मनवेलीकर यांनी स्वीकारली आहे. शालेय शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंतचा सर्व खर्च उचलण्याची तयारी दर्शवत त्यांनी या मुलीच्या आयुष्यात आशेचा नवा किरण निर्माण केला. पालकत्व स्वीकारतानाचा क्षण या निराधार मुलीसाठी आत्मविश्वास व आनंदाचा ठरला.

या प्रसंगी मुलीला शैक्षणिक साहित्य व भेटवस्तू देऊन तिचे अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमास प्रयास ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा अलका मुंदडा, सामाजिक कार्यकर्त्या श्रृती मनवेलीकर, ॲड. रवींद्र शितोळे, सावली संस्थेचे प्रमुख नितेश बनसोडे, राजश्री शितोळे, सल्लागार विद्या बडवे, सचिव उज्वला बोगावत, खजिनदार मेघना मुनोत, लीला अग्रवाल, वैशाली देशपांडे, सारिका सौंदणकर, लावण्या रायपेल्ली, प्रीती चिंचणे, सारिका चक्रनारायण, प्रतीक्षा जगताप, वर्षा मारवाडी, चिन्मयी राऊत यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्रृती मनवेलीकर म्हणाल्या, “निराधार मुलांना केवळ छप्पर आणि अन्न पुरवणे नव्हे, तर त्यांना प्रेम, आधार आणि स्वप्नांना हातभार देणे आपले कर्तव्य आहे. मुली सर्व क्षेत्रांत चमकत आहेत; त्यांनाही समान संधी मिळाल्या पाहिजेत. हा उपक्रम नसून एक चळवळ आहे—‘प्रत्येक अनाथ लेकरू आमचे आहे’ ही भावना समाजात दृढ व्हावी.”

सावली संस्थेचे प्रमुख नितेश बनसोडे म्हणाले, “मनवेलीकर कुटुंबाने एका मुलीच्या भविष्याला दिशा दिली आहे. प्रयास ग्रुपच्या महिलांच्या सहकार्याने उर्वरित ३० मुला-मुलींचेही शैक्षणिक पालकत्व घेतले जाईल,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सल्लागार विद्या बडवे यांनी सांगितले, “सावली संस्था निराधार मुलांना मायेची खरी सावली देण्याचे कार्य करते. मनवेलीकर कुटुंबाचा हा उपक्रम समाजासाठी आदर्शवत आहे. श्रृती मनवेलीकर आपल्या कुटुंबाचा सामाजिक वारसा पुढे नेत आहेत.”

‘सुरभी ब्युटी पार्लर अँड अकॅडमी’च्या संचालिका असलेल्या श्रृती मनवेलीकर यांनी आतापर्यंत शेकडो महिलांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देत स्वावलंबी केले आहे. आता एका निराधार मुलीचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारून त्यांनी समाजासमोर प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे. प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपतर्फे त्यांच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *