अहिल्यानगर जिल्ह्यात ‘डिजिटल डिटॉक्स इंडिया’ मोहिमेची सुरूवात; लहान मुलांच्या मोबाईल व्यसनाविरुद्ध मोठे पाऊल

पालक व शिक्षकांमध्ये जनजागृती आवश्यक – सीईओ आनंद भंडारी

अहिल्यानगर | जैनवार्ता

अहिल्यानगर जिल्हा परिषद व ऋणानुबंध सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने लहान मुलांच्या मोबाईल अतिवापराविरुद्ध ‘डिजिटल डिटॉक्स इंडिया’ या देशातील पहिल्या उपक्रमाचे उद्‌घाटन उत्साहात पार पडले. समाजात मोबाईलच्या अमर्याद वापरामुळे निर्माण होणाऱ्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक समस्या चिंताजनक पातळीवर पोहोचल्या असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी केले.

आनंद भंडारी म्हणाले की,

‘एका कुटुंबातील चार व्यक्ती एकाच खोलीत असले तरी प्रत्येक जण मोबाईलमध्ये गुंतलेला दिसतो. भारतीय माणूस सरासरी ६ तास मोबाईल आणि लॅपटॉपवर घालवतो. विद्यार्थ्यांमध्ये मोबाईल वापर वाढल्यामुळे आत्मविश्वास घटत आहे, अभ्यासाची प्रगती खालावत आहे व मुलं नको त्या गोष्टींच्या आहारी जात आहेत. पालकांनी प्रथम स्वतःचा मोबाईल वापर कमी केल्यास मुलांना योग्य मार्गदर्शन शक्य होईल.’

कार्यक्रमास ऋणानुबंध संस्थेचे अध्यक्ष अजित रोकडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, मनपा प्रशासन अधिकारी जुबेर पठाण, तज्ञ डॉ. ज्ञानेश्वर कांबळे, प्रा. मुरलीधर भुतडा, उपाध्यक्ष सारिका रघुवंशी, सचिव प्रशांत बंडगर आदी मान्यवर उपस्थित होते. विविध शाळांचे मुख्याध्यापक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

मोबाईल व्यसन गंभीर स्वरूपात

अजित रोकडे म्हणाले की,‘मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहेत. मैदानी खेळ कमी झाल्याने आरोग्य समस्या वाढल्या आहेत. मोबाईलपासून मुलांना दूर ठेवण्यासाठी जिल्हा परिषद व ऋणानुबंध संस्थेने देशातील पहिला प्रयोग अहिल्यानगरातून सुरू केला आहे.’

या मोहिमेतून पालक, शिक्षक व अंगणवाडी सेविकांना मोबाईल वापराचे दुष्परिणाम सांगितले जाणार आहेत. मुलांच्या मोबाईल वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोबाईल अ‍ॅप उपलब्ध करण्यात येणार असून त्याद्वारे पालक नको असलेल्या वेबसाईट्स, गेम्स ब्लॉक करू शकतात तसेच मुलांचा मोबाईल वापरण्याचा वेळही ठरवू शकतील.

धक्कादायक आकडेवारी

33% पौगंडावस्थेतील मुले मोबाईल व्यसनाधीन

5 ते 16 वर्षे वयोगटातील 60% मुलांमध्ये व्यसनाची लक्षणे

85% पालकांना मुलांची सवय बदलणे कठीण

54% माता मुलांना शांत ठेवण्यासाठी मोबाईल देतात

34.5% मुलांमध्ये मान-मनगटाचे विकार

54.8% मुलांच्या मानसिक आरोग्यावर दुष्परिणाम

८.३८ लाख पालकांसाठी वेबिनार

ऋणानुबंध संस्थेच्या माहितीनुसार, ‘डिजिटल डिटॉक्स इंडिया’ मोहिमेतून जिल्ह्यातील ८,३८,००० विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत वेबिनारद्वारे जनजागृती केली जाणार आहे.

या वेबिनारमध्ये मोबाईलच्या अतिवापराचे शारीरिक, मानसिक, शैक्षणिक परिणाम; योगा, मेडिटेशन, विविध अ‍ॅप्सद्वारे नियंत्रण याबाबत तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

मार्गदर्शन करणार

डॉ. पराग संचेती, डॉ. सुधा कांकरिया, डॉ. पै रायतुरकर, जगप्रसिद्ध नेत्रतज्ञ तात्याराव लहाने, डॉ. तेजस्विनी मिस्किन, डॉ. गिरीश कुलकर्णी, डॉ. उमेशचंद्र सुद्रीक आदी तज्ज्ञांचे मार्गदर्शन पालकांना मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *