वादांचा दिलासा देणारा मार्ग : राष्ट्रीय लोक अदालतीत 9 प्रकरणांचा सामोपचाराने निकाल, 58.67 लाखांची तडजोड

अहिल्यानगर | प्रतिनिधी

वेळ, पैसा आणि मानसिक तणाव वाचविण्यासाठी लोक अदालत ही आजच्या काळाची अत्यंत महत्त्वाची गरज असल्याचे मत कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश संगीता भालेराव यांनी व्यक्त केले. कौटुंबिक न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते संपन्न झाले. या वेळी त्या बोलत होत्या.

न्यायाधीश भालेराव म्हणाल्या, “न्यायालयीन खटले अनेकदा दीर्घकाळ चालत असल्याने दोन्ही पक्षांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. मात्र लोक अदालतीच्या माध्यमातून सामोपचाराने तडजोड झाल्यास संबंधित पक्षकारांना तात्काळ दिलासा मिळतो. त्यामुळे नागरिकांनी लोक अदालतीचा अधिकाधिक लाभ घ्यावा.”

या राष्ट्रीय लोक अदालतीसाठी पॅनल प्रमुख न्यायाधीश श्रीमती जे. डी. ऊपरकर, पॅनल सदस्य ॲड. भक्ती शिरसाठ, कौटुंबिक न्यायालय वकील संघाचे अध्यक्ष ॲड. लक्ष्मण कचरे, उपाध्यक्ष ॲड. सुरेश लगड, संस्थापक अध्यक्ष ॲड. शिवाजी कराळे, कार्याध्यक्ष ॲड. शिवाजी सांगळे, ॲड. आशा गोंधळे, ॲड. सौ. पंडित आदी मान्यवर उपस्थित होते.

या लोक अदालतीमध्ये जवळपास 200 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 9 प्रकरणांचा सामोपचाराने यशस्वी निकाल लागला असून संबंधित पक्षकारांना एकूण 58 लाख 67 हजार रुपये मंजूर करण्यात आले. या तडजोडीमुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळाल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. शिवाजी सांगळे यांनी केले तर आभार प्रदर्शन ॲड. राजेश कावरे यांनी मानले. लोक अदालतीच्या यशस्वी आयोजनासाठी प्रबंधक नितीन धोंगडे, सहा. अधीक्षक आसिफ शेख, सौ. एस. एस. चव्हाण, रोहित गुंडू, धीरज नारखेडे, सचिन जाधव, श्रीमती एल. एस. जाधव तसेच पोलीस कर्मचारी सौ. ए. ए. शिंदे व श्री एन. ए. कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *