मुंबई | प्रतिनिधी
मराठी दूरचित्रवाणीवरील अत्यंत लोकप्रिय ठरलेली ‘आई कुठे काय करते’ ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तब्बल पाच वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या मालिकेने वर्षभरापूर्वी निरोप घेतला होता. मात्र चाहत्यांच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर आता या मालिकेचे पुनर्प्रसारण होणार असल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे.
ही मालिका येत्या २२ डिसेंबरपासून सोमवार ते शनिवार सायंकाळी ७ वाजता प्रसारित होणार आहे. विशेष बाब म्हणजे यावेळी ही मालिका स्टार प्रवाहऐवजी ‘प्रवाह पिक्चर’ या वाहिनीवर दाखवली जाणार आहे. प्रवाह पिक्चरच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर मालिकेचा जुना प्रोमो शेअर करत ही घोषणा करण्यात आली आहे.
‘आई कुठे काय करते’ ही मालिका अरुंधती देशमुख आणि तिच्या कुटुंबाभोवती फिरणाऱ्या कथानकामुळे घराघरात पोहोचली होती. अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर यांनी साकारलेली अरुंधतीची भूमिका विशेष गाजली. तसेच मिलिंद गवळी (अनिरुद्ध) आणि रुपाली भोसले (संजना) यांच्या भूमिका देखील प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिल्या.
या मालिकेत अरुंधती, अनिरुद्ध, संजना, आप्पा, आई, अभिषेक, यश, ईशा आदी पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. मालिका पुन्हा सुरू होत असल्याची बातमी समजताच सोशल मीडियावर चाहत्यांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, या मालिकेतील प्रमुख कलाकार सध्या इतर मालिकांमधूनही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मात्र ‘आई कुठे काय करते’च्या पुनरागमनामुळे मराठी टीव्हीविश्वात पुन्हा एकदा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.



