पर्यावरण संवर्धनातून नववर्षाचे स्वागत; इसळक गावात वृक्षारोपण उपक्रम

अहिल्यानगर तालुका | प्रतिनिधी

दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तापमानवाढीचे दुष्परिणाम सध्या सर्वत्र जाणवत असून, लहरी हवामानामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची नितांत गरज असल्याचे मत हभप संदीप महाराज कळसे यांनी व्यक्त केले.

तालुक्यातील इसळक येथील गोसावीबाबा मंदिर परिसरात लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कैलास लांडे, पोपट खामकर, सुभाष कोरडे, काका लगड, कृषी सहाय्यक चैतन्य बडवे, रामदास कोतकर, इंजि. मयूर खुंटाळे, नामदेव लोंढे, मारुती दिवेकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कळसे महाराज पुढे म्हणाले की, तरुणांनी एकत्र येऊन राबविलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असून पर्यावरण संवर्धनासाठी लोकचळवळ उभी राहणे आवश्यक आहे. पर्यावरण रक्षण म्हणजे केवळ वृक्षारोपण नव्हे, तर कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन तसेच ध्वनी, जल व वायू प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

यावेळी साहित्यिक रामदास कोतकर यांनी सांगितले की, लग्न समारंभ, वाढदिवस, दशक्रिया व पुण्यस्मरण कार्यक्रमांतील अनावश्यक खर्च टाळून पर्यावरणपूरक उपक्रमांना प्राधान्य दिल्यास समाजात सकारात्मक परिवर्तन घडू शकते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव गवळी यांनी केले, तर देवस्थान समितीचे मुख्य संयोजक संतोष दत्तात्रय गेरंगे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बाप्पू गेरंगे, सरोदास कोतकर, अशोक गेरंगे, प्रमोद गेरंगे, रोहन गेरंगे, अक्षय गेरंगे, शरद खेसे, भानुदास कोतकर, राहुल गेरंगे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

दरम्यान, नववर्षाच्या स्वागतार्थ लावण्यात आलेली सर्व झाडे जगावीत यासाठी मंदिर परिसरात तारेचे कुंपण करण्यात आले असून, ठिबक सिंचनाद्वारे पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. आत्मनिर्धार फाउंडेशन संचलित पर्यावरण संवर्धन समितीच्या माध्यमातून या झाडांच्या संगोपनाची जबाबदारी घेण्यात आली आहे. पुढील काळात इतर सार्वजनिक मोकळ्या जागांवरही वृक्षारोपण करण्याचा मानस असल्याची माहिती पर्यावरण संवर्धन समितीचे अध्यक्ष भानुदास कोतकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *