धोत्रे जि. प. शाळेचा ‘मातीशी नातं’ उपक्रम; शाळेतच शेतीमालाची थेट विक्री

पारनेर | प्रतिनिधी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, धोत्रे खुर्द येथे शिक्षकांच्या पुढाकारातून राबविण्यात येत असलेल्या ‘मातीशी नातं’ या उपक्रमामुळे शिक्षणासोबतच ग्रामविकासालाही नवी दिशा मिळत आहे. या उपक्रमाअंतर्गत शाळेत स्वतंत्र ‘मातीशी नातं’ कक्ष सुरू करण्यात आला असून गावातील शेतकऱ्यांचा शेतीमाल व कडधान्ये थेट विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जात आहेत.

या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ मिळत असून स्थानिक व सेंद्रीय उत्पादनांना चालना मिळत आहे. शाळा केवळ शिक्षणाची संस्था न राहता ग्रामविकासाचे केंद्र बनत असल्याचे चित्र यामुळे स्पष्ट झाले आहे. या उपक्रमाची दखल घेत राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी शिक्षक सचिन ठाणगे व नंदा चेमटे यांचे कौतुक केले असून हा उपक्रम राज्यातील इतर शाळांसाठी आदर्श ठरेल, असे मत व्यक्त केले आहे.

या माध्यमातून विद्यार्थ्यांना शेती, उत्पादन प्रक्रिया, विक्री व आर्थिक व्यवहारांचे प्रत्यक्ष ज्ञान मिळत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये श्रमसंस्कृती, आत्मनिर्भरता आणि उद्योजकतेची भावना बळकट होत आहे. शाळेत सेंद्रीय भाजीपाला, गावराण कडधान्ये, ज्वारी, बाजरी, गहू तसेच लोकर व घोंगडी यांसारख्या वस्तू कमी दरात उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

या उपक्रमाला शेतकरी, पालक व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून शाळा व गाव यांचा परस्पर सहभाग वाढत आहे. ‘स्थानिक ते राष्ट्रीय’ ही संकल्पना प्रत्यक्षात साकार होत असल्याचे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी व्यक्त केले.

‘मातीशी नातं’ या उपक्रमातून शिक्षण, शेती आणि ग्रामविकास यांचा सुंदर संगम घडत असून धोत्रे खुर्दची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राज्यासाठी आदर्श नमुना ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *